
कोपनहेगन, 19 मार्च (हिं.स.)डेन्मार्कमध्ये झालेल्या थॉमस आणि उबर कप २०२६ च्या ड्रॉमध्ये भारतीय बॅडमिंटन संघांना चॅलेंजर गटात स्थान देण्यात आले आहे. आगामी थॉमस आणि उबर कप स्पर्धा डेन्मार्कमधील फोरम हॉर्सेन्स एरिना येथे २४ एप्रिल ते ३ मे दरम्यान आयोजित केली जाईल.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने २०२२ चा थॉमस कप जिंकला असून, आगामी स्पर्धेसाठी त्यांना 'अ' गटात स्थान देण्यात आले आहे. या गटात गतविजेते चीन, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश आहे.
मागील स्पर्धेतील उपविजेता आणि १४ विजेतेपदांसह थॉमस कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या इंडोनेशियाला फ्रान्स, थायलंड आणि अल्जेरियासोबत 'ड' गटात स्थान देण्यात आले आहे.
भारताने २०२२ च्या थॉमस कपमधील आपला एकमेव विजय थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाला ३-० ने पराभूत करून मिळवला होता.पॅरिस २०२४ चा उपांत्य फेरीतील बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, माजी जागतिक क्रमांक १ किदाम्बी श्रीकांत, आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी आपापले सामने जिंकून भारताला इंडोनेशियावर ऐतिहासिक निर्भेळ विजय मिळवून दिला होता.
बॅडमिंटन एशिया सांघिक चॅम्पियनशिपनंतर अंतिम झालेल्या बीडब्ल्यूएफ पुरुष सांघिक जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत भारताने थॉमस कप २०२६ साठी पात्रता मिळवली.
थॉमस कप २०२६ चे गट
गट अ: चीन, भारत, कॅनडा, ऑस्ट्रेलिया
गट ब: जपान, मलेशिया, इंग्लंड, फिनलंड
गट क: चायनीज तैपेई, डेन्मार्क, दक्षिण कोरिया, स्वीडन
गट ड: इंडोनेशिया, फ्रान्स, थायलंड, अल्जेरिया
भारतीय महिला बॅडमिंटन संघाला उबर कप २०२६ च्या गट 'अ' मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यात गतविजेता आणि विक्रमी १६ वेळा विजेता ठरलेला चीन संघ आहे. उबर कप २०२६ च्या गट 'अ' मध्ये भारत आणि चीन यांच्यासोबत यजमान डेन्मार्क आणि युक्रेन यांचा समावेश आहे. भारताने आपल्या सांघिक जागतिक क्रमवारीच्या आधारावर उबर कप २०२६ साठी पात्रता मिळवली आहे. यापूर्वी खंडीय चॅम्पियनशिपमधून पात्र न ठरलेल्या सर्वोच्च मानांकित संघांसाठी राखीव असलेल्या जागांपैकी एक जागा भारताने मिळवली आहे. उबर कपमधील भारतीय संघाची सर्वोत्तम कामगिरी स्पर्धेच्या २०१४ आणि २०१६ मध्ये होती. आणि भारताने तिसरे स्थान पटकावले होते.
उबर कप २०२६ साठीचे गट
गट अ: चीन, भारत, डेन्मार्क, युक्रेन
गट ब: जपान, मलेशिया, तुर्की, दक्षिण आफ्रिका
गट क: चायनीज तैपेई, इंडोनेशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया
गट ड: दक्षिण कोरिया, थायलंड, बल्गेरिया, स्पेन
थॉमस कप ही पुरुषांची जागतिक बॅडमिंटन सांघिक चॅम्पियनशिप आहे, तर उबर कप ही महिलांची चॅम्पियनशिप आहे. आगामी थॉमस कप स्पर्धेची ही ३४ वी आवृत्ती असेल, तर उबर कप ३१ व्यांदा आयोजित केला जात आहे. प्रत्येक स्पर्धेत १६ संघ असतील, ज्यांना प्रत्येकी चार संघांच्या चार गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक गटातील संघ पाच सामन्यांच्या मालिकेत एकमेकांविरुद्ध खेळतील, ज्यात तीन एकेरी आणि दोन दुहेरी सामन्यांचा समावेश असेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.
२०२४ मधील थॉमस आणि उबर कपच्या मागील आवृत्तीत भारतीय पुरुष संघ उपांत्यपूर्व फेरीत अंतिम विजेत्या चीनकडून पराभूत झाला होता, तर महिला संघही उपांत्यपूर्व फेरीत जपानकडून पराभूत झाला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे