
मुंबई, 02 मार्च (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे आणि बहुप्रतिभावान अभिनेते पुष्कर श्रोत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील, साहित्यप्रेमी आणि ज्येष्ठ संपादक सुधाकर श्रोत्री यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. रविवारी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच मराठी मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुधाकर श्रोत्री यांनी तब्बल ६५ वर्षे एका नामांकित वृत्तसमूहात कार्य केले. ब्रँड मॅनेजर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. वृत्तपत्र वितरण व्यवस्थेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. केवळ पत्रकारितेतच नव्हे तर साहित्य क्षेत्रातही त्यांचे कार्य उल्लेखनीय होते. साहित्याची त्यांना प्रचंड आवड होती आणि त्यांनी अनेक कविता लिहिल्या होत्या. ‘वडिलोपार्जित’, ‘लेडीज स्पेशल’ तसेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यावर आधारित ‘खास सचिन’ या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. पार्लेकर कायस्थ या त्रैमासिक मासिकात त्यांनी शेवटपर्यंत संपादक म्हणून काम पाहिले.
त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबीय, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, पुष्कर श्रोत्री यांनी आपल्या जडणघडणीत वडिलांचा मोठा वाटा असल्याचे अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या पुष्कर यांनी २५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रेगे’ चित्रपटात त्यांनी साकारलेली पोलीस अधिकाऱ्याची भूमिका विशेष गाजली होती. तसेच ‘श्श... घाबरायचं नाही’, ‘लाभले आम्हास भाग्य’, ‘अ पेईंग घोस्ट’, ‘हसवा फसवी’, ‘सूर्याची पिल्ले’, ‘एक परिपूर्ण हत्या’ आणि ‘आजीबाई जोरात’ या नाटकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सध्या ते मराठीसोबत हिंदी मनोरंजनविश्वातही सक्रिय आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule