
अकोला, 02 मार्च (हिं.स.)। अकोला महानगरपालिका स्वीकृत सदस्यांसाठी नामनिर्देशन पत्र आज दि. 2 मार्च 2026 पासून अकोला महानगरपाकेच्या नगर सचिव कार्यालयातून वितरीत करण्यात येत असून ईच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी व दि. 6 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अकोला महानगरपालिका आयुक्त यांचेकडे सादर करावे.
नामनिर्देशित सदस्य उमेदवारी अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांची यादी व अधिनियमामधील नमुद अर्हता –
1 नामनिर्देशन पत्र (नॉमिनेशन पेपर), 2. उमेदवारांचे संमतीपत्र, 3. गट नेत्यांचे हमीपत्र, 4 उमेदवाराचे घोषणापत्र, 5. परीशिष्ट-। (शपथपत्र नोटरी), 6 मतदार यादीमध्ये नांव असल्याबाबतची साक्षांकित प्रत, 7. वयाच्या पुराव्याकरीता शाळा सोडलेल्या दाखल्याची सत्यप्रत, 8. संबंधित संघटनेच्या प्रमुखांचे/अध्यक्षांचे शपथपत्र (नोटरी), 9. संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्थ संस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत असल्याचा पुरावा (नोंदणीपत्र), 10. उमेदवार अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून 5 वर्षाचा अनुभव असल्याचा पुरावा, 11. धर्मदाय उप-आयुक्त कार्यालय अकोला यांचेकडील पी.टी. आर. उतारा किंवा संस्थेच्या ठरावासह अध्याक्षाचे प्रतिज्ञालेख व धर्मदाय आयुक्त कार्यालयात प्रस्ताव सादर केल्याबाबतची पोच पावती, 12. संघटनेची घटना/नियमावली इ. ची प्रत, 13. संघटनेचे मागील 5 वर्षाचे लेखापरीक्षण अहवाल, 14. मालमत्ता कर/पाणीपट्टी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र, 15. कंत्राटदार नसल्याचे प्रमाणापत्र.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नामनिर्देशनासाठी अर्हता एखाद्या व्यक्तीकडे पालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान अथवा अनुभव असेल ती व्यक्ती नामनिर्देशित पालिका सदस्याच्या पदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केली जाण्यास पात्र असेल –
(क) राज्यात मान्यताप्राप्त व नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी म्हणून किमान पाच वर्षे काम केलेली असेल, किंवा (ख) किमान पाच वर्ष शिक्षणतज्ञ म्हणून काम केलेली असेल, यामध्ये मान्यताप्राप्त शाळा किवा महाविद्यालयाच्या निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक यांचा समावेश असेल, किंवा (ग) सनदी लेखापाल किंवा परिव्यय लेखापाल म्हणून कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव धारण केलेली असेल, किंवा (घ) कमीत कमी पाच वर्षांचा व्यावसायिक अनुभव असलेली मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवीधारक असेल, किंवा (ङ) राज्यात कमीत कमी पाच वर्षांकरिता अभिवक्ता किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्यामधील पदवीधारक व राज्यात विधी क्षेत्रात काम करण्याचा कमीत कमी पाच वर्षांचा अनुभव असलेली असेल, किंवा नगरपरिषदेचा मुख्य अधिकारी किवा महानगरपालिकेचा सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली किंवा किमान दोन वर्षांचा अनुभव असलेली (च) महानगरपालिकेतून आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेली असेल, किंवा (छ) महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाजकल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्स्त संस्था अधिनियम, 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असलेली असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे