
तेहरान , 02 मार्च (हिं.स.)।इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण प्रदेश युद्धाच्या ज्वाळांमध्ये सापडला आहे. या हल्ल्यानंतर इराणने इस्रायल, इराक, यूएईसह अनेक देशांवर क्षेपणास्त्र डागले आहेत. दुसरीकडे, इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणमध्ये अजूनही बॉम्बहल्ले सुरू आहेत. यादरम्यान, इराणी माध्यमांनी दावा केला आहे की त्यांनी कुवैतमध्ये अमेरिकन सैन्याचे एफ-15 लढाऊ विमान पाडले आहे.
या विमानाच्या अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये विमानाला आकाशातच आग लागलेली दिसत आहे.एफ-15 हे जगातील सर्वात घातक आणि आधुनिक लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. मात्र, विमानाला आग लागताच पायलटने पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
तथापि, या घटनेची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. अमेरिका आणि कुवैतच्या सैन्याकडूनही याबाबत कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. हा अपघात ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ दरम्यान घडल्याचे सांगितले जात आहे, ज्याअंतर्गत अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले केले होते. इराणी अधिकाऱ्यांनी याला प्रतिशोधात्मक आणि संतुलित कारवाई असे संबोधत पुढील तणाव वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode