
तेहरान, 02 मार्च (हिं.स.)।इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येनंतर संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धाची तीव्रता वाढली असून परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. मागील २४ तासांत अमेरिकेच्या लष्करी तळांवर १५ हून अधिक देशांमध्ये हल्ले केल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिका आणि इस्रायल हे युद्ध थांबवण्याच्या भूमिकेत असले तरी इराणने आपला बदला अद्याप बाकी असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या विषयावर अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करणार नसल्याचेही इराणने जाहीर केले आहे. त्यामुळे इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात भीषण संघर्ष सुरूच आहे. दरम्यान, इराणने जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण प्रकल्प मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियातील अरामकोवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
इराणने सौदी अरेबियातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पावर, रास तनुरावर हल्ला केला आहे. हा शुद्धीकरण प्रकल्प सौदी सरकारी मालकीच्या तेल कंपनी सौदी अरामकोचा आहे. माहितीनुसार, या हल्ल्यानंतर शुद्धीकरण प्रकल्प बंद करण्यात आला आहे.
दरम्यान,इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे स्पष्ट केले आहे की तेहरान अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या चर्चा किंवा कराराच्या बाजूने नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी लिहिले की अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा किंवा वाटाघाटी होणार नाहीत आणि देश आपल्या धोरणावर ठामपणे कायम राहील. इराणने अमेरिकेशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताला उत्तर म्हणून हे विधान आले आहे.
इराणने आज पुन्हा हल्ले सुरू केले आहेत, ज्यात इस्रायल, कतार, बहरीन आणि संयुक्त अरब अमिराती यांना लक्ष्य केले आहे. दरम्यान, लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाह देखील या संघर्षात सामील झाला आहे. त्यांनी इस्रायलमधील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले आहेत. इराणकडून पाठिंबा मिळवणाऱ्या हिजबुल्लाहने आता म्हटले आहे की ते खामेनीच्या मृत्यूचा बदला घेत आहेत.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, इराणविरुद्धची लष्करी कारवाई सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. परिस्थितीत बदल झाल्यास सुरक्षा देण्याची पूर्ण हमी अमेरिकेकडून दिली जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या ताज्या व्हिडिओ संदेशात ट्रम्प यांनी अमेरिकेची उद्दिष्टे अत्यंत गंभीर असल्याचे सांगत इराणी लष्करी कर्मचाऱ्यांना शस्त्रे टाकण्याचा इशारा दिला. अन्यथा त्यांना निश्चित मृत्यूला सामोरे जावे लागेल, असा कठोर इशाराही त्यांनी दिला. त्यांनी इशारा देताना परिस्थिती “अत्यंत भयावह” ठरू शकते, असेही म्हटले.
इराणवरील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे जगभरातील हवाई प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सोमवारीही शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यामुळे लाखो प्रवासी विविध देशांमध्ये अडकून पडले. अहवालांनुसार, विमान कंपन्यांचे शेअरही घसरले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी असे संकेत दिले आहेत की अमेरिकेची लष्करी कारवाई चार ते पाच आठवडे टिकू शकते, ज्यामुळे हवाई प्रवासात आणखी अनिश्चितता वाढू शकते. मध्य पूर्वेतील अनेक प्रमुख विमानतळ बंद आहेत. जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळ मानले जाणारे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सलग तिसऱ्या दिवशीही बंद राहिले. कोविड-१९ साथीच्या आजारानंतरची ही सर्वात मोठी हवाई संकटाची परिस्थिती मानली जात आहे.
मध्य पूर्वेतील उड्डाणे रद्द झाल्यामुळे हजारो सेवा प्रभावित झाल्या आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी त्यांची उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत.सोमवारी सकाळपर्यंत १,२३९ उड्डाणे आधीच रद्द करण्यात आली होती. दुबईस्थित एमिरेट्स, अबू धाबीस्थित एतिहाद एअरवेज आणि दोहास्थित कतार एअरवेजने एकत्रितपणे शेकडो उड्डाणे रद्द केली आहेत.फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटअवेअरनुसार, शनिवारी सुमारे २,८०० आणि रविवारी ३,१५६ उड्डाणे रद्द करण्यात आली.
कुवेतमधील लोकांना अमेरिकन दूतावासात येण्यास मनाई
कुवेतमधील अमेरिकन दूतावासाने लोकांना घरात राहण्याचा आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. बाहेर अजिबात जाऊ नका. कुवेतमध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दूतावासातील कर्मचारी सध्या सुरक्षित ठिकाणी आहेत. पूर्वी दूतावासाजवळ धुराचे लोट उठताना दिसले होते.
अहवालानुसार, अमेरिका आणि इस्रायलने एकत्र येऊन आतापर्यंत इराणच्या 1000 हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या दरम्यान, सुरुवातीच्या 30 तासांत 2000 हून अधिक बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 740 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका शाळेवर क्षेपणास्त्र पडल्याने 180 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आणि 45 जखमी झाल्या आहेत. 28 फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या लढाईच्या पहिल्या दिवशी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode