ओमानच्या आखातात तेल टँकरवर हल्ला, भारतीय नागरिकाचा मृत्यू
मस्कत, 02 मार्च (हिं.स.)। इराणविरुद्ध सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका युद्धामध्ये एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्याने चौफेर हल्ले सुरू केले असून या पार्श्वभूमीवर अन
ओमानच्या आखातात तेल टँकरवर हल्ला; भारतीय नागरिकाचा मृत्यू


मस्कत, 02 मार्च (हिं.स.)। इराणविरुद्ध सुरू असलेल्या इस्रायल-अमेरिका युद्धामध्ये एका भारतीय नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणी सैन्याने चौफेर हल्ले सुरू केले असून या पार्श्वभूमीवर अनेक तेल टँकरनाही लक्ष्य केले जात आहे. ओमानच्या आखातात अशाच एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये असलेल्या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला.

परराष्ट्र मंत्रालयाने मृत व्यक्तीची ओळख जाहीर केलेली नाही; मात्र सूत्रांच्या माहितीनुसार तो भारतीय वंशाचा होता. बचाव करण्यात आलेल्या लोकांमध्ये १६ भारतीय, चार बांगलादेशी आणि एक युक्रेनियन नागरिकाचा समावेश आहे.

माहितीनुसार, स्फोटकांनी भरलेली एक बोट या तेल टँकरला धडकली, त्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि टँकरला आग लागली. या घटनेत भारतीय वंशाच्या एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला, तर इतर २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. ही घटना ओमानच्या आखातात मस्कत प्रांताच्या किनाऱ्याजवळ घडली. टँकरला धडक देणाऱ्या बोटीत कोणतीही व्यक्ती प्रवास करत नव्हती.

सोमवारी ओमानने सांगितले की, ओमानच्या आखातात ड्रोनद्वारे मार्शल आयलंड्सच्या ध्वजाखालील एका तेल टँकरवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये जहाजावरील एका नाविकाचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, हा हल्ला सल्तनतची राजधानी मस्कतच्या किनाऱ्यापासून दूर ओमानच्या आखातात झाला. संबंधित जहाजाची ओळख ‘एमकेडी व्योम’ अशी करण्यात आली असून मृत नाविक भारतातील असल्याचे म्हटले आहे.

इराण फारसच्या आखाताच्या अरुंद प्रवेशद्वाराजवळील होर्मुज सामुद्रधुनीकडे येणाऱ्या जहाजांना सतत धमक्या देत असून अनेक हल्ल्यांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धादरम्यान हे हल्ले घडत असल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande