
इस्लामाबाद, 02 मार्च (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये अमेरिकन दूतावास आणि वाणिज्य दूतावासांबाहेर झालेल्या हिंसक आंदोलन आणि झटापटींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सरकारने सुरक्षा इशारा जारी केला आहे.
अमेरिकन दूतावासाने सांगितले की लाहोर आणि कराची येथे सुरू असलेली आंदोलने व हिंसाचार, तसेच इस्लामाबाद आणि पेशावर येथे अतिरिक्त निदर्शनांची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकन कर्मचाऱ्यांना हालचाली मर्यादित ठेवण्याचे आणि घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सुरक्षा सूचनेत अमेरिकन नागरिकांना स्थानिक बातम्यांवर लक्ष ठेवण्याचा, गर्दीपासून दूर राहण्याचा, परिसरात सतर्क राहण्याचा आणि आपले एसटीईपी नोंदणी तपशील अद्ययावत ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
अमेरिकन दूतावासाने पुढे सांगितले की कराची आणि लाहोर येथील अमेरिकन वाणिज्य दूतावास तसेच इस्लामाबाद येथील अमेरिकन दूतावासामधील २ मार्च रोजीची सर्व व्हिसा अपॉइंटमेंट आणि अमेरिकन नागरिकांसाठीच्या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कराची येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर हिंसक निदर्शने झाल्यानंतर एका अमेरिकन पुराणमतवादी (कन्झर्व्हेटिव्ह) कार्यकर्त्याने अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडे पाकिस्तानातील नागरिकांचे सर्व व्हिसा, अगदी ग्रीन कार्डदेखील रद्द करण्याची मागणी केली आहे. लॉरा लूमर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांना टॅग केले आणि लिहिले की, “अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने शक्य तितक्या कालावधीसाठी पाकिस्तान्यांचे सर्व व्हिसा आणि ग्रीन कार्ड निलंबित करावेत.”
ही मागणी कराचीतील अमेरिकन वाणिज्य दूतावास परिसरासमोर झालेल्या हिंसक आंदोलन आणि झटापटींच्या वृत्तांनंतर करण्यात आली आहे. लूमर यांनी दावा केला की पाकिस्तानमध्ये इराणचे सर्वोच्च नेते यांच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या सहा निदर्शकांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले. हे निदर्शक अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या कडेकोट सुरक्षा असलेल्या परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी पुढे आरोप केला की दुपारी पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करताना अनेकांना गोळ्या लागल्या आणि काहींचा मृत्यू झाला.मात्र, त्यांच्या या मागणीवर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode