राजस्थानातील नागौरमध्ये जेएसडब्ल्यू सिमेंटचा हरित प्रकल्प सुरू
जयपुर, 20 मार्च (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंटने त्यांच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून राजस्थानातील
JSW Cement


जयपुर, 20 मार्च (हिं.स.)। भारतातील आघाडीच्या हरित सिमेंट उत्पादकांपैकी एक आणि विविध क्षेत्रांत कार्यरत जेएसडब्ल्यू समूहाचा एक भाग असलेल्या जेएसडब्ल्यू सिमेंटने त्यांच्या राष्ट्रीय विस्ताराच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून राजस्थानातील नागौर जिल्ह्यात अत्याधुनिक, हरितक्षेत्र, एकात्मिक सिमेंट उत्पादन प्रकल्पात उत्पादनास प्रारंभ केला आहे. उत्तर भारतातील त्यांचा हा पहिलाच असा प्रकल्प आहे. उत्तर भारतात या प्रवेशासह कंपनीची एकूण सिमेंट ग्राइंडिंग क्षमता 24.1 दशलक्ष टन प्रति वर्ष झाली आहे आणि एकूण क्लिंकर उत्पादन क्षमता (कंपनीच्या जेएसडब्ल्यू सिमेंट एफझेडसी या संयुक्त उपक्रमासहित क्लिंकर क्षमता) 9.74 दशलक्ष टन प्रति वर्ष झाली आहे.

नागौर येथील एकात्मिक प्रकल्प 3.30 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेचे क्लिंकरायझेशन युनिट आणि 2.50 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेच्या सिमेंट ग्राइंडिंग युनिटने सुसज्ज आहे. याशिवाय, या ठिकाणी अतिरिक्त 1.00 दशलक्ष टन प्रति वर्ष सिमेंट ग्राइंडिंग युनिटचे बांधकाम सुरू आहे. महत्त्वाच्या ठिकाणी वसलेल्या या प्रकल्पामुळे राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर) या उच्च-वाढीच्या बाजारपेठांना सेवा पुरवता येईल. नागौर युनिटसाठी इक्विटी आणि दीर्घकालीन डेब्ट यांच्या धोरणात्मक मिश्रणातून निधी उभारण्यात आला आहे. कंपनीने आपल्या प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) मधून मिळालेल्या फ्रेश इश्यूच्या निधीतून 800 कोटी रु. या प्रकल्पाच्या अंशतः वित्तपुरवठ्यासाठी विशेषतः राखून ठेवले होते.

याबद्दलची घोषणा करताना जेएसडब्ल्यू सिमेंटचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ जिंदाल म्हणाले: “राजस्थानातील नागौर येथील प्रकल्पात उत्पादनास सुरुवात होणे हा जेएसडब्ल्यू सिमेंटसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनीला अखिल भारतीय स्तरावरील प्रमुख कंपनी बनविण्याच्या मार्गावर दृढपणे उभे करणे हे आमचे उद्दिष्ट आम्ही आमच्या आयपीओ प्रक्रियेच्या वेळी स्पष्ट केले होते. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनामुळे कंपनीने जलदगतीने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. आम्ही या प्रदेशाच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यास आणि राजस्थान, हरियाणा, पंजाब तसेच एनसीआर क्षेत्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यास उत्सुक आहोत. मला अत्यंत आनंद आहे की कंपनीने केवळ 21 महिन्यांत हा ग्रीनफिल्ड एकात्मिक प्रकल्प कार्यान्वित करून आपल्या प्रकल्प अंमलबजावणी क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. या कामाची सुरुवात करून कंपनी आर्थिक वर्ष 29 पूर्वी किंवा तोपर्यंत 41.85 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमता साध्य करण्याच्या मार्गावर ठामपणे वाटचाल करत आहे.”

जेएसडब्ल्यू सिमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नार्वेकर यांनी पुढे सांगितले: “वेगाने वाढणाऱ्या उत्तर भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे ही आमच्यासाठी एक धोरणात्मक प्राधान्याची गोष्ट आहे. या राज्यांमध्ये उच्च वाढ दर आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा विकास होत आहे. नागौर प्रकल्पाद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे, पर्यावरणपूरक सिमेंट आणि जागतिक दर्जाचा सेवा अनुभव पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच जगातील सर्वात शाश्वत सिमेंट उत्पादकांपैकी एक म्हणून आपले स्थान आम्ही कायम राखत आहोत. या विस्तारासह, कंपनी भारतातील 41.85 दशलक्ष टन प्रति वर्ष मिड टर्म क्षमता लक्ष्याच्या जवळ पोहोचत आहे आणि 60 दशलक्ष टन प्रति वर्ष क्षमतेच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाकडेही वाटचाल करत आहे.”

हा प्रकल्प शाश्वत उत्पादनाचे आदर्श उदाहरण म्हणून डिझाइन करण्यात आला आहे. या सुविधा केंद्रामध्ये किल्नमध्ये पर्यायी इंधनांच्या सह-प्रक्रियेसाठी तरतूद आहे तसेच खाणीतून चुनखडी वाहून नेण्यासाठी 7 किमी लांबीचा ओव्हरलँड बेल्ट कन्व्हेयर आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीमुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी होतो. या जागतिक दर्जाच्या प्रकल्पात लवकरच 16 मेगावॅट क्षमतेचा वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टम (डब्ल्यूएचआरएस) देखील समाविष्ट होणार आहे. त्यायोगे उत्पादन प्रक्रियेतून निर्माण होणारी उष्णता पुनर्प्राप्त करून पुन्हा वापरली जाईल आणि त्यामुळे कार्बन फूटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande