
परभणी, 22 मार्च (हिं.स.)।
पोलीस परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रात गुटखा विरुद्ध मोहीम आणखी कडक केली असून गुटथखा व प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विरुद्ध केलेल्या पाच कारवाईत नऊ जणांना गजाआड करण्यात आले असून या कारवाईत तब्बल ८ लाख ४२ हजार ९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहिमेअंतर्गत परभणी जिल्ह्यातील बोरी, नांदेड जिल्ह्यातील भाग्यनगर आणि मुखेड, लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण व हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ अशा पाच पोलीस ठाणे क्षेत्रात कारवाई करण्यात आली. विविध गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून तब्बल ८ लाख ४२ हजार ९० रुपयांच्या किंमतीचा गुटखा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १२३ अन्वये कारवाई करण्यात आली असून हा खटला सत्र न्यायालयात चालविण्यात येणार असून त्यास दहा वर्षापर्यंतच्या कारावासासह द्रव्यदंडाची देखील शिक्षा असल्याने अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांना पोहोचता यावी यासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली खबर नावाची हेल्पलाइन सुरू केली असून नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायाची माहिती या क्रमांकावर अथवा फोन कॉल द्वारे द्यावी असे आवाहन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis