कर्जत स्टेशनवर दोन आरोपींसह 2 लाखांचा गुटखा जप्त
रायगड, 22 मार्च (हिं.स.)।कर्जत : रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोस्ट कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून सुमारे ₹2,00,715/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. 21 मार्च 2026 रोजी कर्जत रे
RPF raids Karjat station; Gutkha worth ₹2 lakh seized along with two accused


रायगड, 22 मार्च (हिं.स.)।कर्जत : रेल्वे सुरक्षा बल (RPF) पोस्ट कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला तस्करीविरोधात मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून सुमारे ₹2,00,715/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दि. 21 मार्च 2026 रोजी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली.

आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे सकाळी 07:00 ते दुपारी 3 या वेळेत ड्युटीवर होते. दरम्यान, ट्रेन क्रमांक 22944 डाउन इंदौर–दौंड एक्सप्रेस कर्जत स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर सकाळी 07:12 वाजता दाखल झाली.

ट्रेनची तपासणी सुरू असताना S-2 डब्यातून दोन व्यक्ती 4 ते 5 मोठ्या बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना आढळले. संशयावरून त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे दोघांना RPF पोस्ट कर्जत येथे आणण्यात आले.

उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. आरोपींनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय 23, रा. कामोठे, पनवेल) व अंकुश कुमार हरी कुमार (वय 21, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली.

तपासणीदरम्यान त्यांच्या पाच बॅगांमधून विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, V-1 तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण 2,00,715/- किमतीचा माल जप्त करण्यात आला. हा मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे फूड इन्स्पेक्टर प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल जीआरपी कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला.

या प्रकरणी जीआरपी कर्जत यांनी CR No. 31/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 275, 223, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 च्या कलम 30(2)(a), 59, 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande