
अमरावती, 23 मार्च (हिं.स.) : वरुड येथे धान्य व्यापाऱ्याकडे लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीवर तब्बल तीन कोटी पाच लाख ८८ हजार रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी वरुड पोलिसांनी मुख्य संशयितासह एकूण सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांच्या माहितीनुसार, गोपाल रामकृष्ण चौधरी (वय ४०, रा. शिवाजीनगर, वरुड) हा मुख्य संशयित असून त्याची पत्नी, बहीण, सासू तसेच संजय वासुदेव गुल्हाने व मयूर संजय गुल्हाने (रा. नेरपरसोपंत, जि. यवतमाळ) यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. धान्य व्यापारी लोकेश संतोष अग्रवाल (वय ४८) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. अग्रवाल यांचे थोक धान्य खरेदी-विक्रीचे प्रतिष्ठान असून ऑगस्ट २०१९ पासून गोपाल चौधरी हा लेखापाल म्हणून तेथे काम करत होता. आर्थिक व्यवहारांसह ओटीपीसंबंधित मोबाईलची जबाबदारीही त्याच्याकडे होती.
दरम्यान, अग्रवाल आजारी पडल्यामुळे त्यांनी मुलगा दर्शन याला व्यवसायाकडे लक्ष देण्यासाठी पाठविले. त्याने बँक व्यवहार तपासले असता ३ ते १२ डिसेंबर २०२५ या कालावधीत काही व्यवहार संशयास्पद आढळले. बँकेकडून माहिती घेतल्यावर तीन खात्यांमधील रक्कम लेखापाल गोपाल चौधरी याने त्याच्या पत्नीच्या खात्यात वळविल्याचे समोर आले. पुढील तपासात एकूण ३ कोटी ५ लाख ८८ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशयितांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.या संदर्भात वरुडचे ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी सांगितले की, आर्थिक अपहाराशी संबंधित गुन्हा असल्याने प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे.
काही मालमत्ता परत
मालकाने चौकशी केल्यानंतर गोपाल चौधरी याने चूक मान्य करून काही रक्कम परत केली. त्यात ७६ ग्रॅम सोन्यासह रोख व इतर मालमत्ता असा एकूण ४२ लाख ५० हजार रुपयांचा समावेश असून ती रक्कम अग्रवाल व त्यांच्या कुटुंबीयांना परत देण्यात आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
दोन ठिकाणी जमीन खरेदी
अपहारातून मिळालेल्या पैशांतून चौधरीच्या नावावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गोडेगाव ग्रामपंचायत हद्दीत खानापूर येथे सुमारे दोन हेक्टर जमीन तसेच पत्नीच्या नावावर नेरपरसोपंत येथे १,५११ चौरस फूट क्षेत्रफळाची जमीन खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित जमीनही परत करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी