कोलंबियामध्ये विमान अपघात; ६६ जणांचा मृत्यू, अनेक जण अद्याप बेपत्ता
बोगोटा, 24 मार्च (हिं.स.)।दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात सोमवारी एक भीषण विमान अपघात घडला. या अपघातात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त विमानात एकूण 125 जण प्रवास करत होते आणि टेक
कोलंबियामध्ये विमान अपघात


बोगोटा, 24 मार्च (हिं.स.)।दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशात सोमवारी एक भीषण विमान अपघात घडला. या अपघातात 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघातग्रस्त विमानात एकूण 125 जण प्रवास करत होते आणि टेक-ऑफनंतर काही क्षणांतच विमान कोसळले.

कोलंबियाच्या सैन्याने सुमारे 66 जवानांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. यापूर्वी पुएर्तो लेगुइजामो शहराच्या महापौरांनी 34 जवानांच्या मृत्यूची माहिती दिली होती. माध्यमांच्या अहवालानुसार 20 हून अधिक जवान अजूनही बेपत्ता आहेत.

वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हरक्युलिस सी-130 या विमानात 121 जण होते, ज्यामध्ये 110 सैनिक आणि 11 क्रू सदस्यांचा समावेश होता. हे विमान सोमवारी उड्डाण करताना दुर्घटनाग्रस्त झाले. विमानाने कोलंबियातील पुटुमायो प्रांतातील पुएर्तो लेगुइजामो येथून उड्डाण केले होते; मात्र काही वेळातच ते कोसळले. हे अपघातग्रस्त विमान अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिन यांनी तयार केलेले हरक्युलिस सी-130 लष्करी वाहतूक विमान होते. अपघातानंतर विमानातून वाहतूक केली जात असलेला दारुगोळा आणि स्फोटकेही फुटल्याने नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आणि बचावकार्य कठीण बनले.

हरक्युलिस सी-130 ही विमाने 1950 च्या दशकात तयार करण्यात आली होती आणि कोलंबियाने 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात ही विमाने खरेदी केली होती. सध्या कोलंबियाचे सैनिक वाहून नेण्यासाठी या विमानांचा वापर केला जात आहे.पुएर्तो लेगुइजामो हे शहर पुटुमायो प्रांतात असून ते अमेझॉन क्षेत्रात येते. या प्रदेशाच्या सीमा इक्वाडोर आणि पेरू या देशांना लागून आहेत. संरक्षण मंत्री पेद्रो सांचेज यांनी ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान पुटुमायोमधीलच दुसऱ्या शहरात सैनिकांना घेऊन जात होते.

कोलंबियातील माध्यमांनी शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये अपघातस्थळाजवळील शेतातून काळ्या धुराचे मोठे लोट उठताना दिसत आहेत. तसेच सैनिकांनी भरलेला एक ट्रक घटनास्थळाकडे वेगाने जाताना दिसत आहे. वायुसेनेच्या निवेदनानुसार, अपघातस्थळावरून किमान 77 जणांना जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मृतांची अंतिम संख्या अद्याप निश्चित केली जात आहे.

कोलंबियन वायुसेनेचे कमांडर कार्लोस फर्नांडो सिल्वा यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही; मात्र विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि विमान विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर कोसळले. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्या प्रशासनावर टीका करणाऱ्यांनी आरोप केला आहे की, बजेट कपातीमुळे लष्करी विमानांच्या उड्डाण तासांमध्ये घट झाली असून त्यामुळे वैमानिक आणि क्रू सदस्यांचा अनुभव कमी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande