
नवी दिल्ली, 24 मार्च (हिं.स.)आयपीएल २८ मार्चपासून सुरू होणार आहे. राजस्थान रॉयल्सने दुखापतग्रस्त क्रिकेटपटू सॅम करनच्या जागी श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू दसुन शनाकाची घोषणा केली आहे. शनाका यापूर्वी पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळणार होता. मात्र, आता त्याने आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक आणि संघ संचालक कुमार संगकारा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, हंगामाच्या अगदी सुरुवातीला सॅमसारखा प्रतिभावान क्रिकेटपटू दुखापतीमुळे अनुपलब्ध आहे हे निराशाजनक आहे. त्यांनी पुढे सांगितले की, सॅम फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाबतीत संघासाठी एक अत्यंत मौल्यवान क्रिकेटपटू आहे. मात्र, दसुन शनाकाच्या रूपात आम्हाला एक आदर्श पर्याय मिळाल्याचा आनंद आहे. तो एक फिनिशर (शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करणारा विशेषज्ञ) आणि एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेटपटू आहे. तो आमच्या संघाचा समतोल राखण्यास मदत करेल.
शनाका सध्या उत्कृष्ट फलंदाजीच्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ओमानविरुद्ध २० चेंडूंमध्ये वेगवान अर्धशतक आणि पाकिस्तानविरुद्ध ३१ चेंडूंमध्ये नाबाद ७६ धावा केल्या. तो एक उपयुक्त खालच्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज असून संघाला संतुलन देतो. शनाका यापूर्वी आयपीएल २०२३ मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळला होता. पण त्या हंगामातील त्याची कामगिरी विशेष प्रभावी नव्हती.
झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुझारबानीनंतर, पाकिस्तान सुपर लीग सोडून आयपीएलमध्ये खेळणारा शनाका हा दुसरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरला आहे. आयपीएल लिलावात बोली न लागल्याने, पीएसएल फ्रँचायझी लाहोर कलंदर्सने ₹७.५ दशलक्षमध्ये शनाकाला करारबद्ध केले. राजस्थान रॉयल्स ३० मार्च रोजी गुवाहाटी येथे चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध घरच्या मैदानावर सामना खेळून आयपीएल २०२६ ची सुरुवात करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे