
ढाका, 24 मार्च (हिं.स.)बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यास मान्यता दिली आहे. बांगलादेशने यापूर्वी आपल्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानला जाण्याची परवानगी नाकारली होती. पण आता बोर्डाने क्रिकेटपटूंना पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
पीएसएलसाठी ही एक स्वागतार्ह बातमी आहे, कारण यापूर्वी अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलसाठीचे आपले करार नाकारले होते. जर बांगलादेश सरकारने आपल्या क्रिकेटपटूंना खेळण्याची परवानगी नाकारली असती, तर तो आणखी एक मोठा धक्का ठरला असता. पाकिस्तान सुपर लीगवर आधीच परिणाम झाला आहे. पीसीबीने ही लीग दोन ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून प्रेक्षकांना परवानगी दिलेली नाही.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, बांगलादेशी क्रिकेटपटूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. या चर्चेनंतर, पीएसएलमध्ये बांगलादेशी क्रिकेटपटूंना कोणत्याही सुरक्षेची चिंता नाही, याची खात्री झाली. इस्लामाबादमधील बांगलादेश दूतावासाने दिलेल्या आश्वासनांच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला. या आश्वासनानंतर, खेळाडू लीगमध्ये सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला रवाना झाले आहेत.
पीएसएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च रोजी सुरू होणार आहे. आगामी हंगामापूर्वी दोन नवीन संघांचा समावेश करण्यात आला होता. यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला. पण, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी अलीकडेच जाहीर केले की, आगामी हंगाम केवळ दोन शहरांमध्ये (लाहोर आणि कराची) आयोजित केला जाईल. इतकेच नाही, तर प्रेक्षकांनाही परवानगी दिली जाणार नाही. लीगसमोरील आणखी एक आव्हान म्हणजे, अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये सामील होण्यासाठी आधीच त्यांचे पीएसएल करार मोडले आहेत. यामध्ये ब्लेसिंग मुझारबानी आणि दसुन शनाका यांच्या नावांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे