दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा
नवी दिल्ली, 24 मार्च, (हिं.स.) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका असेल, जी १७ एप्रिल रोजी सुरू होऊन २७ एप्रिलपर्यंत खेळवण्यात
भारतीय महिला क्रिकेट संघ


नवी दिल्ली, 24 मार्च, (हिं.स.) - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका असेल, जी १७ एप्रिल रोजी सुरू होऊन २७ एप्रिलपर्यंत खेळवण्यात येणार आहे. अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करणार आहे, तर स्मृती मंधानाची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा संघ अनुभव आणि युवा प्रतिभेचा उत्तम मिलाफ आहे. विशेषतः अनुष्का शर्माला मिळालेली ही पहिलीच संधी या दौऱ्याला अधिकच रोमांचक बनवते. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील दमदार कामगिरी आणि मोठ्या विजयाच्या जोरावर या मालिकेत उतरेल.

अनुष्का शर्माची भारतीय संघात पहिल्यांदाच निवड झाली आहे. तिने अलीकडेच महिला प्रीमियर लीगमध्ये (डब्ल्यूपीएल) गुजरात जायंट्सकडून उत्कृष्ट कामगिरी केली. अनुष्काने या स्पर्धेत सात डावांमध्ये १२९.१९ च्या स्ट्राईक रेटने १७७ धावा केल्या. तिची सर्वोत्तम धावसंख्या ४४ होती. तिच्या कामगिरीचे फळ म्हणून तिची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे.

संघाची फलंदाजी सुसंतुलित दिसत आहे. शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारख्या भरवशाच्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. रिचा घोष आणि उमा छेत्री यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहेत. श्रेयंका पाटील आणि श्री चरणी अनुभवी दीप्ती शर्मासोबत एक मजबूत फिरकी गोलंदाजीची जोडी तयार करतील. रेणुका ठाकूर, अरुंधती रेड्डी आणि क्रांती गौड वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करतील.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

पहिला आणि दुसरा सामना: १७ आणि १९ एप्रिल, डर्बन

तिसरा आणि चौथा सामना: २२ आणि २५ एप्रिल, जोहान्सबर्ग

पाचवा सामना: २७ एप्रिल, बेनोनी

भारतीय महिला संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी, श्रेयंका पाटील, काश्वी गौतम, भारती फुलमाली, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुष्का शर्मा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande