
अमरावती, 26 मार्च (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रशासनाची कामकाज पद्धती समजून देण्यासाठी तसेच प्रेरणादायी संवाद घडवून आणण्यासाठी “कॉफी विथ कमिशनर” हा विशेष उपक्रम नुकताच आयोजित करण्यात आला. या उपक्रमात महानगरपालिकेच्या विविध शाळांमधील इयत्ता चौथी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी मनपा आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या संवादातून विद्यार्थ्यांना महानगरपालिकेचे कामकाज, प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि आयुक्तांच्या जीवनप्रवासाबद्दल जवळून जाणून घेण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या स्वरूपात अनेक उत्सुकतादायक प्रश्न विचारले. आयुक्तांचे बालपण कुठे गेले, शालेय जीवनातील आठवणी, करिअरमधील अविस्मरणीय क्षण, आयएएस होण्यामागील प्रेरणा, अखिल भारतीय स्तरावर ९वा क्रमांक मिळाल्यानंतरची भावना यांसारख्या वैयक्तिक प्रश्नांसोबतच प्रशासनाशी संबंधित अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी मांडले. तसेच महापालिका आयुक्तांच्या प्रमुख जबाबदाऱ्या, शहरातील प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्या हाताळण्यासाठीची योजना, कचरा व्यवस्थापन व पुनर्वापर प्रणाली, ‘स्वच्छ अमरावती’ मोहिमेत नागरिकांचा सहभाग आणि अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठीच्या भविष्यातील योजना याबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
या चर्चेत गुंजन राऊत, सिद्धिका वानखेडे, आर्यन विश्वकर्मा, निर्भय वाहुरवाघ, अलीना शहा, रेहान शहा, अयमन जाकीर, शेख इरफान, श्रीकुमार मंजलवार, भार्गवी गेडाम, अरविंद कुशवाहा, जोया फिरदोस, अश्विन गजभे, चैताली बैस, विनय कुशवाहा, ईशानी कोटांगळे आणि अलिशबा नवाल मुश्ताक शहा यांसह अनेक विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना अत्यंत सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने उत्तरे देत त्यांना मार्गदर्शन केले.
संवादादरम्यान आयुक्तांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कुटुंबीयांनाही स्वच्छता व पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी करून घेतल्यास अमरावती शहर अधिक स्वच्छ व सुंदर बनू शकते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, अमरावती महानगरपालिका शाळांमध्ये चालू शैक्षणिक सत्रापासून ‘इंग्लिश क्लब’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजीचे वातावरण मिळावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि संवाद कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने इंग्रजीत संवाद साधल्याचे पाहून आयुक्तांनी समाधान व्यक्त केले.
इंग्लिश क्लबच्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबविण्यासाठी शिक्षण अधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, शाळा निरीक्षक योगेश पखाले तसेच ब्रँड अँबेसिडर चेतन आर्वीकर, रोहन वासनिक, वनिता सावरकर, मंजुषा कलहाने, पूजा भांडे, वृषाली साकरकर, विनय वानखडे, आशिष कोपूल, स्वप्नील रंगारी, प्रियंका हंबर्डे, प्रणाली ठाकरे आणि इतर शिक्षक सातत्याने प्रयत्नशील आहेत. यावेळी जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर यांचीही उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी