
अमरावती, 26 मार्च (हिं.स.)। ग्रामीण भागात विशेषतः चिखलदरा तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, मोथा गावाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. चार तालुक्यांमधील आठ गावांमध्ये विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून वाढते उष्णतामान पाहता येत्या काही दिवसांत आणखी काही गावांना टॅंकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते. यंदा मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच पाणीटंचाईचे चटके सुरू झालेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून यंदाचा पाणीटंचाई कृती आराखडा हा १९ कोटी सात लाख रुपयांचा आहे. चिखलदरा तालुक्यातील मोथा गावाला तीन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. असे असले तरी बहुतांश गावांमध्ये अशीच परिस्थिती आहे. नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत, तर अनेक गावांत पाण्याचा स्रोत मर्यादित असल्याने त्यावर महिलांची गर्दी होत आहे. यंदा जवळपास साडेसातशे गावे टंचाईच्या कवेत येण्याची दाट शक्यता आहे. कारण यंदा फेब्रुवारी-मार्चपासूनच उष्णतामान वाढले असून आराखड्यानुसार ५४५ संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये नळयोजना, बंद हातपंपाची दुरुस्ती, नळयोजनेची विशेष दुरुस्ती, वीजपंप सुरू करणे आदी कामे प्रस्तावित असून त्यापैकी काही गावामंध्ये कामांना सुरवात देखील झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार टॅंकर सुरू केले जातील.
टॅंकरची गावे ः- मोथा (चिखलदरा) विहिरीचे अधिग्रहण वाढोणा रामनाथ, पळसमंडळ, पिंप्री गावंडा (नांदगाव खंडेश्वर), बोर्डी व परसापूर (अचलपूर), गणेशपूर व दाभेरी (मोर्शी), मोथा (चिखलदरा) सध्या काही गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पाणीटंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून संभाव्य गावांमध्ये टंचाई निर्माण होऊ नये, याचे प्रयत्न केले जात आहे. -स्नेहा धावडे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जि. प.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी