
संपूर्ण जिल्हा ‘टीबीमुक्त’ करण्यासाठी 100 दिवसांचे अभियान
रायगड, 26 मार्च (हिं.स.)क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी रायगड जिल्हा आरोग्य विभागाने हाती घेतलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, जिल्ह्यातील तब्बल 444 ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त झाल्या आहेत. आता संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी 100 दिवसांचे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत 2023 पासून ‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान’ सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत 2023 मध्ये 90, 2024 मध्ये 376 आणि 2025 मध्ये 444 ग्रामपंचायतींनी क्षयरोगमुक्तीचा दर्जा प्राप्त केला आहे.जिल्ह्यात सध्या 2,549 क्षयरुग्णांवर शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून, 2,101 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. 2025 या वर्षात एकूण 4,308 रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी 2,102 रुग्ण बरे झाले असून 1,788 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2026 च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत 879 रुग्ण आढळले असून त्यापैकी 761 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.‘प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियान’ अंतर्गत विविध क्षेत्रातील नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंपन्या ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढाकार घेत असून, क्षयरुग्णांना पोषण आहार देऊन त्यांच्या उपचार प्रक्रियेला मदत करत आहेत.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेमार्फत आयोजित मिनी सरस जिल्हास्तरीय प्रदर्शनात अलिबाग तालुक्यातील सहाण, चिंचोटी, बेलोशी आणि पेढांबे ग्रामपंचायतींना क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल सुवर्ण प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.100 दिवसांच्या विशेष अभियानाअंतर्गत घरोघरी जाऊन संशयित रुग्णांची तपासणी, आधुनिक यंत्रणेद्वारे चाचण्या, रुग्णांचा औषधोपचार पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा, तसेच शाळा-महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. दुर्गम भागांमध्ये विशेष तपासणी शिबिरेही आयोजित करण्यात येणार आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करून उपचार सुरू करावेत. प्रशासन आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून रायगड जिल्हा लवकरच पूर्णपणे क्षयरोगमुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)