मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी ‘अभय योजना’ जाहीर; विलंब दंडावर ५०% सवलत
रायगड, 26 मार्च (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. ही योजना दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत थकबाकी एकरकमी भरल्यास विलं
'Abhay Yojana' announced for property tax defaulters; 50% discount on late payment penalty


रायगड, 26 मार्च (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता कर थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी विशेष ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली आहे. ही योजना दि. ३१ मार्च २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार असून, या कालावधीत थकबाकी एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा महत्त्वाचा महसूल स्त्रोत असून, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण यांसारख्या मूलभूत सेवांसाठी या कराचा उपयोग केला जातो. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कर भरणे ही जबाबदारी पार पाडावी, असेही त्यांनी नमूद केले.

महानगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी काही मालमत्ताधारकांकडून अद्याप थकबाकी बाकी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी कर आकारणी व संकलन विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. निवासी, बिगर निवासी, औद्योगिक तसेच मोकळ्या जागांच्या मालमत्तांनाही या योजनेचा लाभ लागू राहणार आहे. मात्र, सवलतीचा लाभ घेण्यासाठी आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंतची संपूर्ण थकबाकी एकरकमी भरणे बंधनकारक आहे.

नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर किंवा ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ या मोबाईल अॅपद्वारे Debit/Credit Card, Internet Banking, NEFT, RTGS, UPI याद्वारे कर भरता येणार आहे. तसेच मुख्यालय, विभागीय कार्यालये व भरणा केंद्रांवर रोख, धनादेश किंवा धनाकर्षाने भरणा करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

महत्त्वाचे म्हणजे, या योजनेअंतर्गत मूळ कराच्या रकमेत कोणतीही सवलत नसून केवळ विलंब दंडावरच ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. योजनेच्या कालावधीनंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहणार असल्याने नागरिकांनी ३१ मार्चपूर्वीच थकीत कराचा भरणा करून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande