
रायगड, 26 मार्च (हिं.स.) : अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा बहुप्रतीक्षित ‘आम्माकॉन 2026’ स्नेहमेळावा अलिबागजवळील सह्याद्री लॉन येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमात अलिबाग व मुरुड तालुक्यातील सुमारे 200 डॉक्टरांनी आपल्या कुटुंबियांसह सहभाग नोंदवत स्नेह आणि एकतेचा अनोखा अनुभव घेतला.
सांस्कृतिक, शैक्षणिक आणि स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमांनी मेळाव्याला रंगत आली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकचे विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. देवेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत, सचिव डॉ. ओमकार पाटील, खजिनदार डॉ. वैजेश पाटील, उपाध्यक्ष डॉ. अमेय केळकर व डॉ. अमित बेणकर, सहसचिव डॉ. भूषण शेळके व डॉ. सुलतान हसवारे, सहखजिनदार डॉ. अभिराज पाटील व डॉ. प्रांजली पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी वैद्यकीय क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. महेंद्र दोशी, डॉ. रवींद्र म्हात्रे, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. खानावकर, डॉ. मकरंद आठवले, डॉ. अनघा भगत, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. गणेश गवळी आणि डॉ. उज्वल जैन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान डॉ. आशिष भगत आणि डॉ. श्वेता बागडे लिखित वैद्यकीय क्षेत्रासाठी उपयुक्त पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच कार्यक्रमस्थळी वैद्यकीय उपकरणे आणि संबंधित माहिती देणारे स्टॉलही उभारण्यात आले होते.सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबिरे आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प पुढेही राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत यांनी आपल्या मनोगतात नमूद केले.--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)