
बीड, 26 मार्च (हिं.स.)।
अंबाजोगाई तालुक्यातील नागरिकांनी इंधनासाठी घाबरून जाण्याचे किंवा पेट्रोल पंपांवर गर्दी करण्याचे कोणतेही कारण नसून तालुक्यात पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तालुक्यातील एक-दोन ठिकाणचे पेट्रोल पंप तांत्रिक कारणास्तव बंद असले तरी प्रशासनाने पेट्रोलियम पुरवठा प्रतिनिधींशी थेट चर्चा केली असून तिथेही लवकरच इंधन उपलब्ध होणार आहे. इंधन तुटवड्याबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. सध्या तालुक्याची इंधन स्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी विनाकारण साठा करण्यासाठी गर्दी करू नये असे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis