बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार कोण ?
पुणे, 26 मार्च (हिं.स.)। बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली, तरी का
सुनेत्रा पवार


पुणे, 26 मार्च (हिं.स.)।

बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली असली, तरी काँग्रेसकडे इच्छुक उमेदवाराची वानवा असल्याची दिसून येते. पुणे जिल्हा काँग्रेसने निवडणूक लढविण्याची तयारी असल्याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविला असला, तरी इच्छुक उमेदवारांबाबत माहिती देण्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या असणार आहेत. त्यांच्याविरोधात भाजप उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्यास काँग्रेसने उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविली आहे. काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवारीसाठी दावा केला नाही, तर काँग्रेस ही जागा लढवण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदार संघांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष निवडणूक लढवणार नसेल, तर निवडणूक लढविण्यास तयारी असल्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा अहवाल प्रदेश पातळीवर पाठविण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande