
मुंबई, 26 मार्च (हिं.स.) - मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी काॅंग्रेसने जोरदार टीका केली आहे. झिरवाळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही, तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे. जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी, ही साधी अपेक्षा असते. मात्र, हा व्हिडिओ पाहता त्या अपेक्षांचा पूर्णपणे भंग झाल्याचे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
माजी मंत्र्याने ट्रॅप लावला - वडेट्टीवार
दुसरीकडे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आला आहे. झिरवाळ यांना अडकवण्यासाठी माजी मंत्र्याने ट्रॅप लावल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. झिरवाळांची जागा रिकामी करून घेण्यासाठी एक मोठं नाव समोर येत आहे. सरकारमधील एक माजी मंत्री आहे. तोच हे सगळं करतो आहे. जर झिरवाळांची जागा खाली झाली, तर त्याची एन्ट्री होईल, असा सगळा प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे. जे नको आहेत ते टार्गेट होत आहेत. प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची आहे. स्पर्धा खूप आहे त्यामध्ये. एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसलाय. त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढायला तिसरा लाईनमध्ये आहेच. आशामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे, असे देखील ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी