
नाशिक, 26 मार्च (हिं.स.)। महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा पहिला बळी मंगळवारी (दि.२४) रात्री गेला. अंबड-सातपूर लिंक रोडवर सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याने प्रभाकर निकम (४९) या व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार अपघात नसून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घडलेली घटना असल्याचा आरोप करत नगरसेवक निवृत्ती इंगोले आणि नितीन दातीर यांनी नागरिकांसह मनपा आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
“या मृत्यूला जबाबदार कोण?” असा सवाल उपस्थित करत संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. आयुक्तांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत ठेकेदारावर कारवाईचा इशारा दिला.
अशोकनगर परिसरातील रहिवासी आणि अंबड येथे कपड्यांचा व्यवसाय करणारे प्रभाकर निकम हे मंगळवारी रात्री घरी परतत असताना हा अपघात झाला. सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून, तिथे कोणतेही दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स किंवा रिफ्लेक्टर्स लावण्यात आलेले नव्हते. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.निकम यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार असून, मुलीच्या लग्नाची बोलणी सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
आयुक्त तत्काळ घटनास्थळी दाखल
नगरसेवकांनी सुमारे एक तास आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी आयुक्त सिंहस्थ प्राधिकरणाच्या बैठकीत होत्या. आंदोलनाची माहिती मिळताच उपमहापौर विलास शिंदे आणि गटनेते अजय बोरस्ते यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. अखेर आयुक्तांनी बैठक सोडून आंदोलकांची भेट घेतली.
चौकट
सुरक्षेचे नियम पाळले नाहीत“काम सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेची मूलभूत उपाययोजना देखील करण्यात आलेली नाही. बॅरिकेडिंग करणे आवश्यक असताना नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. विकास हवा, पण तो लोकांच्या जीवाशी खेळणारा नसावा.”– विलास शिंदे, उपमहापौर
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV