
तेहरान, 26 मार्च (हिं.स.)।अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर संभाव्य भूदल (जमिनीवरील) लष्करी कारवाई होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने कडक इशारा दिला आहे. आयआरजीसीने अमेरिकेच्या जनतेला उद्देशून म्हटले आहे की, “आपल्या मुलांना नरकात पाठवू नका.” दरम्यान, इस्रायलने इराणमधील अनेक शहरांवर हल्ले सुरूच ठेवले आहेत.
आयआरजीसीने अमेरिका आणि इस्रायलला इशारा देत सांगितले की, इराणच्या भूमीवर कोणत्याही संभाव्य लष्करी कारवाईचा विचारही करू नये. अमेरिका आणि इस्रायलच्या जनतेला उद्देशून जारी केलेल्या निवेदनात आयआरजीसीने म्हटले आहे की, “बेंजामिन नेतान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भ्रमात पडून आपल्या मुलांना नरकात पाठवू नका.” त्यांनी पुढे दावा केला की, हल्ला करणारे सैनिक इराणी जनतेच्या लाखोंच्या समुद्रात बुडून गायब होतील.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने असेही म्हटले की, युद्धभूमीवरील वास्तव विकृत पद्धतीने सादर करून लोकांची दिशाभूल केली जात आहे. निवेदनात म्हटले आहे, “युद्धाची खरी परिस्थिती तुम्हाला अमेरिकेतील पेट्रोल पंपांवर, इराणच्या रस्त्यांवर तसेच तेल अवीव आणि हैफा यांच्या आकाशात दिसून येईल.”
एका अहवालानुसार, पेंटागॉन मध्यपूर्वेत 82व्या एअरबोर्न डिव्हिजनमधील सैनिक तैनात करण्याची योजना आखत आहे. या अहवालात एका सूत्राच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, या डिव्हिजनमधील काही भाग — ज्यामध्ये कमांड युनिट आणि काही भूदलांचा समावेश आहे — या प्रदेशात पाठवण्याची तयारी सुरू आहे. ही तैनाती अमेरिकेकडून खर्ग बेटावर संभाव्य जमिनीवरील कारवाईची शक्यता दर्शवत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) गुरुवारी सांगितले की, त्यांनी इराणमधील इस्फहान येथे मोठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. आयडीएफच्या माहितीनुसार, इराणी शासनाच्या पायाभूत सुविधांना अनेक ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. यापूर्वी इस्रायली हवाई दलाने गुप्तचर माहितीनुसार सांगितले होते की, त्यांनी रात्रभर तेहरान परिसरात इराणी शासनाच्या शस्त्रनिर्मिती केंद्रांवर लक्ष्य साधत हल्ल्यांची मालिका पूर्ण केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode