परभणी जिल्ह्यात इंधन साठा मुबलक, दुचाकीला २००, चारचाकीला २,००० रुपयांची मर्यादा
- कॅन-बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी परभणी, 26 मार्च (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर इंधन टंचाईबाबत अफवा पसरत असून, त्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट क
परभणी जिल्ह्यात इंधन साठा मुबलक, दुचाकीला २००, चारचाकीला २,००० रुपयांची मर्यादा


- कॅन-बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी

परभणी, 26 मार्च (हिं.स.)।

गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर इंधन टंचाईबाबत अफवा पसरत असून, त्यामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, परभणी जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, वाढती गर्दी आणि पुरवठा साखळीतील तात्पुरता ताण टाळण्यासाठी प्रशासनाने इंधन विक्रीवर काही तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांना एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपयांचे, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त २,००० रुपयांपर्यंत इंधन दिले जाणार आहे. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव आणि काळाबाजार रोखण्यासाठी कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सर्व पेट्रोल पंप चालकांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पारदर्शकता राखण्यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपाने दररोज सकाळी शिल्लक इंधन साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांवर ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ अंतर्गत कारवाई करून परवाना रद्द करण्यासह कडक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande