डॉ. जयसिंगराव पवार अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
कोल्हापूर, 26 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा घाटा
डॉ. जयसिंगराव पवार यांच्यावर अंत्यसंस्कार


कोल्हापूर, 26 मार्च (हिं.स.) : महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील देदीप्यमान व्यक्तिमत्त्व आणि मराठेशाहीचे पुराव्यानिशी अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांचे आज पहाटे वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा घाटावर हजारो नागरिक उपस्थित होते, तसेच इतिहासकार, साहित्यिक, राजकारणी आणि सामान्य वाचक यांच्यात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह राज्यभरातील नेते आणि लेखकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

डॉ. पवार यांचा जन्म ३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर गावात एका सामान्य कुटुंबात झाला. गरिबी आणि संघर्ष असूनही त्यांनी कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून एम.ए. (सर्वोत्कृष्ट) आणि शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. १९६४ पासून डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करून त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्य केले.

मराठा इतिहासातील दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकणारे डॉ. पवार यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान म्हणजे ‘महाराणी ताराबाई’ व ‘राजर्षी शाहू छत्रपती’ ही चरित्रे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर औरंगजेबाविरुद्ध स्वराज्य टिकवण्यात ताराबाईंचा मोलाचा वाटा पुराव्यानिशी सिद्ध केला. त्यांनी ५० हून अधिक ग्रंथ आणि ४५ शोधनिबंध लिहिले असून, ‘सेनापती संताजी घोरपडे’, ‘मराठेशाहीचा मागोवा’ यांसारखे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’ (तीन खंड, १२०० पानांचा) संपादित करून तो अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केला गेला.

डॉ. पवार हे ‘महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी’ संस्थेचे संस्थापक-संचालक होते, शाहू संशोधन केंद्राचे संचालक म्हणून कार्यरत राहिले आणि अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून तीन वर्षे अध्यक्षपद भूषवले. त्यांनी राजर्षी शाहू स्मारक ट्रस्ट व जिल्हा प्रशासनाला ऐतिहासिक सल्ले देऊन शाहू मिल आणि खासबाग मैदान जतन केले.

गुरुवारी सकाळी १० वाजता ‘शिवतेज’ बंगला, साने गुरुजी वसाहत, कोल्हापूर येथून डॉ. पवार यांची अंत्ययात्रा निघाली. यात्रा पंचगंगा स्मशानभूमीत पोहोचली, यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार शाहू छत्रपती, आमदार जयंत आसगावकर, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी महापौर आर. के. पोवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलिसांनी बंदुकीच्या ३ फैरी झाडून त्यांना सलामी दिली, तसेच पोलीस धून सादर करण्यात आली.हजारो कोल्हापूरवासीयांनी ‘डॉ. जयसिंगराव पवार अमर रहे’ अशा घोषणांसह श्रद्धांजली अर्पण करून इतिहासाच्या या साक्षेपी अभ्यासकाला साश्रू नयनांनी अंतिम दर्शन घेतले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande