
जेरुसलेम, 26 मार्च (हिं.स.)। इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आआरजीसी) च्या नौदलाचे कमांडर रिअर अॅडमिरल अलीरेजा तंगसीरी यांच्या मृत्यूच्या वृत्तामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. इस्रायली माध्यमांनी एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्याने दावा केला आहे की, अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात बंदर अब्बास येथे तंगसीरी ठार झाले. मात्र, इराणकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही, तसेच इस्रायली सैन्यानेही या हल्ल्याबाबत मौन बाळगले आहे.
अलीरेजा तंगसीरी 2018 पासून आयआरजीस नौदलाचे कमांडर म्हणून कार्यरत होते. इराणच्या नौदल धोरणातील प्रमुख चेहऱ्यांपैकी ते एक मानले जात होते. विशेषतः होर्मुज जलडमरूमध्य बंद करण्याच्या धमक्या आणि त्यासंबंधित रणनीतीशी त्यांचे नाव जोडले गेले होते.तंगसीरी यांनी अनेकदा सार्वजनिकरीत्या सांगितले होते की, गरज पडल्यास इराण हा जलडमरूमध्य बंद करू शकतो. अमेरिका आणि इस्रायलविरोधात इराणची सागरी क्षमता मजबूत करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अमेरिका-इस्रायलच्या कथित लक्ष्यांपासून आतापर्यंत बचावलेल्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता.
दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधातील लष्करी कारवाया अधिक तीव्र केल्याचे म्हटले जात आहे. बंदर अब्बास हे इराणचे महत्त्वाचे बंदर असून ते होर्मुज जलडमरूमध्याजवळ स्थित आहे आणि आयआयजीसीच्या नौदल हालचालींचे प्रमुख केंद्र मानले जाते. इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात तंगसीरी ठार झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे; मात्र दोन्ही देशांकडून अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode