पायाभूत सोयी सुविधांची कामे वेळेत पूर्ण करावीत - नाशिक जिल्हाधिकारी
Infrastructure works should be completed on time.
Infrastructure works should


त्र्यंबकेश्वर येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे पाहणीवेळी निर्देश

नाशिक, 26 मार्च (हिं.स.)। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी कुंभमेळा होत आहे. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून राज्य शासनाच्यावतीने विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे वेळेत पूर्ण करताना गुणवत्ता पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध विकास कामांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, एमएसआयडीसीच्या कार्यकारी अभियंता स्नेहल पगार, जलसंपदा विभागाचे उपअभियंता वडगावकर, उपअभियंता केतन पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गोदावरी नदीवरील घाट, गोदावरी घाट लगत सुरू असलेले डीपी रोडचे काम, दर्शनपथचे प्रस्तावित काम, नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेले डब्ल्यूटीपीचे काम, प्रस्तावित घनकचरा प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. तसेच जिल्हाधिकारी प्रसाद यांनी भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांशी त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या कार्यालयात संवाद साधला. गोदावरी नदीवरील घाटांच्या बांधकामात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना नियमानुसार मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande