इराणला मला त्यांचा सर्वोच्च नेता बनवायचे होते, पण मी नकार दिला - ट्रम्प
वॉशिंग्टन, 26 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, इराणमधील लोकांनी त्यांना देशाचा सर्वोच्च नेता (सुप्रीम लीडर) बनवण्या
इराणला मला त्यांचा सर्वोच्च नेता बनवायचे होते,पण मी नकार दिला- ट्रम्प


वॉशिंग्टन, 26 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, इराणमधील लोकांनी त्यांना देशाचा सर्वोच्च नेता (सुप्रीम लीडर) बनवण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. ट्रम्प यांच्या या विधानामुळे जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, इराण अमेरिकेसोबत कोणत्याही शांतता चर्चेला नकार देत असताना हा दावा समोर आला आहे.

वॉशिंग्टनमधील एका निधी संकलन कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणकडून त्यांना हा प्रस्ताव मिळाला होता; परंतु त्यांना त्या पदामध्ये कोणतीही रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, इराण अमेरिकेसोबत चर्चा करून युद्ध संपवू इच्छित आहे, पण अंतर्गत भीतीमुळे ते उघडपणे बोलत नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, इराणने आधीच असे सर्व दावे फेटाळून लावले आहेत.

ट्रम्प यांनी असेही म्हटले की, अमेरिका-इस्रायलच्या लष्करी कारवाईनंतर इराणमध्ये सत्तेची पोकळी निर्माण झाली आणि त्याच काळात त्यांना सुप्रीम लीडर बनवण्याची चर्चा पुढे आली. हा प्रस्ताव अनौपचारिक स्वरूपात मांडण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तथापि, या दाव्याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही आणि इराणकडूनही याला समर्थन मिळालेले नाही.

ट्रम्प यांच्या मते, इराण चर्चा करू इच्छित आहे आणि करारासाठी तयार आहे. तेहरानमधील अधिकारी भीतीमुळे ही बाब सार्वजनिक करत नसल्याचा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे, इराणने स्पष्ट केले आहे की युद्ध केवळ त्यांच्या अटींवरच संपेल आणि कोणत्याही दबावाखाली ते निर्णय घेणार नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी विधाने समोर येत आहेत.

इराणने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या अटी मान्य झाल्यासच युद्ध समाप्त होईल. यामध्ये हल्ले थांबवण्याची हमी, युद्धामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील त्यांच्या सार्वभौमत्वाची मान्यता यांचा समावेश आहे. तसेच, आपल्या भूमिकेतून मागे हटणार नसल्याचे आणि प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरूच ठेवण्याचेही इराणने सांगितले आहे.

पश्चिम आशियातील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आहे. अमेरिका आणि इस्रायलची लष्करी कारवाई सुरू असताना इराणकडूनही प्रत्युत्तरात्मक हल्ले होत आहेत. ट्रम्प यांच्या विधानांमुळे आणि इराणच्या नकारामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. सध्या शांततेचा कोणताही स्पष्ट मार्ग दिसत नसून जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande