
तेहरान , 26 मार्च (हिं.स.)।मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता इराणने एक असा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सुमारे एक मिनिटांचा हा व्हिडिओ इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये अमेरिकेला जगाचा शत्रू म्हणून दाखवत अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रण करण्यात आले असून व्हिडिओच्या शेवटी इंग्रजीत एक घोषवाक्य दिसते, ज्याचा अर्थ आहे — “सर्वांसाठी एक बदला.”
काही दिवसांपूर्वी इराणने जगभरातील पर्यटन स्थळांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर लगेचच हा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अमेरिकेविरोधातील अनेक जुन्या घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. यात अमेरिकेतील मूळ रहिवाशांवरील अन्याय, जपानवर टाकलेले अणुबॉम्ब, व्हिएतनाम युद्ध तसेच अलीकडील मध्य पूर्वेतील संघर्षांचे दृश्य दाखवण्यात आले आहे. या सर्व घटनांद्वारे अमेरिकेला जागतिक शत्रू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
व्हिडिओतील एका दृश्यात जेफ्री एपस्टीनच्या बेटावर एका मुलाचे दृश्य दाखवले आहे. इराण सरकार यापूर्वीही या मुद्द्यावर वारंवार भाष्य करत आले असून, डोनाल्ड ट्रम्प युद्ध सुरू करून या घोटाळ्याकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतरच्या दृश्यांमध्ये आयतुल्ला अली खामेनेई आणि कासिम सुलेमानी यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या प्रतिमा दाखवल्या आहेत, ज्यात ते आकाशाकडे पाहताना दिसतात.
व्हिडिओच्या शेवटच्या भागात सर्वात धक्कादायक दृश्य दाखवले आहे. इराणी ध्वजाच्या रंगांची मिसाइल न्यूयॉर्क हार्बरमध्ये प्रवेश करते आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला धडकते. या दृश्यात पुतळ्याच्या डोक्याच्या जागी बायबलमधील कथित खोटा देव ‘बाल’ याचे रूप दाखवले आहे. मिसाइलच्या धडकेनंतर संपूर्ण पुतळा नष्ट होताना दाखवला आहे.
दरम्यान, रशियाच्या सरकारी माध्यम संस्थाने हा व्हिडिओ शेअर केला. यापूर्वी तो इराणी ब्रॉडकास्टरशी संबंधित असल्याचे सांगितले गेले होते. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलनेदेखील स्वतंत्र एआय व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संघर्ष त्यांच्या दृष्टिकोनातून दाखवण्यात आला आहे. त्या व्हिडिओमध्ये इराणला मार्शल आर्ट लढणाऱ्या फारसी मांजरांच्या रूपात, तर अमेरिकेला गरुडाच्या डोक्याचा मानव म्हणून दाखवण्यात आले होते. हा व्हिडिओ हॉर्मुज जलडमरूमध्यातील तणावावर आधारित होता.
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध संयुक्त लष्करी कारवाई सुरू केल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या अनेक एआय प्रचार व्हिडिओंपैकी हा एक असल्याचे सांगितले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode