‘ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन भारत’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
रायगड, 26 मार्च (हिं.स.) : अलिबाग येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील यांनी ‘ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन भारत’ या नव्या संघटनेत देशभरातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. केरळमध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे उद्दिष्ट ज्येष्ठ पत्रकारांच्
Join the Senior Journalists Federation of India – Dr. Jaipal Patil’s appeal


रायगड, 26 मार्च (हिं.स.) : अलिबाग येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ. जयपाल पाटील यांनी ‘ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन भारत’ या नव्या संघटनेत देशभरातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. केरळमध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे उद्दिष्ट ज्येष्ठ पत्रकारांच्या हक्कांसाठी देशव्यापी पातळीवर काम करणे आहे.

संघटनेच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचे संमेलन १४ व १५ मार्च रोजी गोवा येथे पार पडले. या संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित (दिल्ली) यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची नियमावली मंजूर करण्यात आली. देशभरातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमात किमान १५ वर्षे सेवा केलेले आणि ५८ वर्षे पूर्ण केलेले ज्येष्ठ पत्रकार या संघटनेत सदस्य होऊ शकतात.

संघटनेचा प्रमुख उद्देश केंद्र सरकारकडून सर्व राज्यांमध्ये समान ₹२५,००० पेन्शन योजना लागू करणे हा आहे. याशिवाय पत्रकारांसाठी आरोग्य योजना, नियमित निवडणुका आणि संघटनात्मक बळकटीकरणावरही भर देण्यात येणार आहे.

सदस्यत्वासाठी वार्षिक वर्गणी ₹१,००० निश्चित करण्यात आली असून त्यातील ₹३०० रक्कम केंद्रीय समितीकडे पाठवली जाणार आहे.

राज्य समितीत किमान ५० सदस्य आवश्यक असतील आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आदी पदांची संरचना निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नोंदणीसाठी फॉर्म डॉ. जयपाल पाटील (अलिबाग), ओमप्रकाश शिंदे (जालना), संजय जोशी (पुणे), चंद्रकांत गायकवाड (सोलापूर), अशोक जोशी (देऊळगाव राजा), माधव पवार (नांदेड), सौ. भारती शहा (खोपोली-खालापूर) आणि पूजा पांडेय (मुंबई) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

लवकरच पुणे येथे महाराष्ट्र शाखेची बैठक आयोजित करण्यात येणार असून, राज्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी राष्ट्रीय उपाध्यक्ष सुहासिनी प्रभुगावकर यांच्यावर सोपवली आहे. त्या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. जयपाल पाटील यांनी दिली

------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande