जावेळे गावात बिबट्याचा धुमाकूळ; वासराचा बळी, ग्रामस्थ आक्रमक
रायगड, 26 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील जावेळे गावात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काल मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात शिरून वासराचा बळी घेतल्याची धक्काद
Leopard sighting in Javele; Forest Department's management questioned


रायगड, 26 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील जावेळे गावात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काल मध्यरात्री बिबट्याने थेट गोठ्यात शिरून वासराचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत (पिंट्या) मळेकर यांच्या घराशेजारील गोठ्यात रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला. गोठ्यातील जनावरे अचानक ओरडू लागल्याने घरातील सदस्य जागे झाले. त्यांनी तात्काळ बॅटरी घेऊन गोठ्याकडे धाव घेतली असता, बिबट्या वासरावर ताव मारताना दिसला. मात्र, लोकांचा आवाज आणि प्रकाश पाहून बिबट्याने वासराला अर्धवट अवस्थेत सोडून अंधारात पलायन केले. या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून जावेळे परिसरात बिबट्याचे हल्ले सातत्याने वाढत असून, यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा बळी गेला आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने संताप तीव्र झाला आहे.या घटनांमुळे गावात भीतीचे सावट पसरले असून नागरिक दिवसाढवळ्याही शेतात जाण्यास घाबरत आहेत. रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव सतर्कतेच्या स्थितीत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावावा, रात्रीची गस्त वाढवावी आणि मृत जनावरांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशा मागण्या केल्या आहेत. वनविभागाने वेळीच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande