
लातूर, 26 मार्च (हिं.स.)।
जिल्हा पोलीस दलाने राबविलेल्या “ऑपरेशन शोध-III” या विशेष मोहिमेत उल्लेखनीय यश मिळवत एकूण 150 बेपत्ता महिला व बालकांचा शोध लावण्यात आला आहे. या मोहिमेत शोधासोबतच सुरक्षित पुनर्वसनावरही विशेष भर देण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने 6 ते 22 मार्च या कालावधीत ही मोहीम राबविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके व त्यांच्या पथकाने जिल्हाभर समन्वय साधत ही कारवाई प्रभावीपणे पार पाडली.
या मोहिमेचा उद्देश अनैतिक मानवी वाहतूक रोखणे, बेपत्ता महिला व बालकांचा शोध घेणे आणि संशयित ठिकाणी छापे टाकून त्यांचे संरक्षण करणे हा होता. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या मदतीने रेल्वे स्थानके, बसस्थानके, हॉटेल्स, लॉज, ढाबे तसेच इतर सार्वजनिक व संशयित ठिकाणी काटेकोर तपासणी करण्यात आली.
या कारवाईत सामाजिक संस्था, महिला व बालकल्याण विभाग आणि स्थानिक नागरिकांचेही सहकार्य घेण्यात आले. मोहिमेदरम्यान एकूण 121 महिला, 23 मुली आणि 6 मुलांचा शोध लावण्यात आला.
शोधण्यात आलेल्या सर्वांची सखोल पडताळणी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक त्या प्रकरणांमध्ये संबंधितांना पुनर्वसन केंद्रात दाखल करून त्यांच्या सुरक्षिततेची योग्य काळजी घेण्यात आली.
“ऑपरेशन शोध-III” ही मोहीम केवळ शोधापुरती मर्यादित न राहता समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना आपल्या हरवलेल्या सदस्यांचा पुन्हा सहवास लाभला आहे.
लातूर जिल्हा पोलीस दल अशा मोहिमा पुढेही सातत्याने राबविणार असून नागरिकांनी संशयास्पद हालचाली, मानवी तस्करी किंवा बेपत्ता व्यक्तींबाबत तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis