
अमरावती, 26 मार्च, (हिं.स.) शहरात पेट्रोल-डिझेल इंधनटंचाईचे सावट गडद होत असून अनेक पेट्रोलपंप कोरडे पडल्याचे चित्र बुधवारी दिसून आले. परिणामी, ज्या पंपांवर थोडाफार साठा उपलब्ध आहे, तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळपासूनच दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहूवाहनांचे चालक इंधनासाठी प्रतीक्षा करताना दिसले. काही ठिकाणी तर रांगा रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याने वाहतूक कोंडीही निर्माण झाली.
अमरावती शहरामध्ये एकूण २१ पेट्रोल पंप आहेत. तर जिल्ह्याच्या सर्व १४ तालुक्याक एकूण १५० पेट्रोल पंप आहे. या सर्व पेट्रोल पंपावर सेवा प्रभावित झाली आहे. पेट्रोल पंप मालकांना दोन दिवसांपूर्वी अॅडव्हान्स भरल्यानंतर पुरवठा होतो. त्यामुळे आता मोठी अडचण निर्माण झाली आहे.
शहरातील अनेक पेट्रोल पंपावरील पेट्रोल पंप नियोजित वेळेपेक्षा अगोदरच बंद करण्यात आल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा धास्ती घेत सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, जिल्हा प्रशासनाने तसेच महाराष्ट्र आणि विदर्भ पेट्रो डिलर्स असोसिएशनने इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी