
नागपूर, 26 मार्च (हिं.स.) -
नागपूरमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील जामठा क्लोव्हरलीफ इंटरचेंजचा लीफ नंबर 01 हा भाग नागरिकांचा विरंगुळा आणि जैवविविधता क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने सामंजस्य करार केला आहे. हा सामंजस्य करार म्हणजे दोन्ही आस्थापनांनी पर्यावरण संवर्धन आणि हरित पायाभूत सुविधा विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
अलिकडेच झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक (तांत्रिक) आणि प्रादेशिक अधिकारी राकेश प्रकाश सिंह आणि महाराष्ट्र राज्य नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन दल प्रमुख) एम. श्रीनिवास राव यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या प्रकल्पाअंतर्गत 2026-27 या कालावधी दरम्यान सुमारे 10 हेक्टर जमीन पक्षी उद्यान आणि पक्षी विहार क्षेत्र म्हणून विकसित केले जाणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कळवले आहे. या परिसरात नागरिकांचा विरंगुळा आणि जैवविविधता क्षेत्र तयार करणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. यामुळे या परिसराचे पर्यावरणीय मूल्य वाढेल आणि पर्यटकांना निसर्गाचा एक अनोखा अनुभव घेता येणार आहे. हा प्रकल्प भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ऑक्सिजन पार्क या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा उपक्रम म्हणजे पायाभूत सुविधांच्या विकासात पर्यावरणीय संवर्धनाचा मेळ घालण्याच्या प्रगत दृष्टिकोनाचेच प्रतीक आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 34 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.
पक्षी विहार या संकल्पनेवर हे उद्यान विकसित केले जाईल, याअंतर्गत पक्ष्यांसाठी अनुकूल असे वृक्षारोपण, पर्यावरणस पूरक पायाभूत सुविधा आणि जैवविविधता संवर्धनाला चालना देणाऱ्या घटकांचा अंतर्भाव असेल.
या प्रकल्पाचे मुख्य घटक खालीलप्रमाणे
पक्षी प्रदर्शन :
याअंतर्गत पर्यटकांना फिरता येईल असे मोठे पक्षी विहार (वॉक-थ्रू एव्हियरी) क्षेत्र असेल. येथे पोपट आणि उष्णकटिबंधीय पक्षांसाठी विशेष पिंजरे, जमिनीवर राहणाऱ्या पक्षांसाठी संरक्षक कठडे आणि स्थानिक वनस्पतींचा आधारे तयार केलेली नैसर्गिक अधिवास व्यवस्थेचा अंतर्भाव असणार आहे.
वैद्यकीय आणि विलगीकरण सुविधा :
याअंतर्गत पक्ष्यांसाठी समर्पित रुग्णालय अथवा दवाखाने, नवीन आणलेल्या पक्ष्यांसाठी विलगीकरण क्षेत्र आणि पिलांच्या संगोपनासाठी विशेष रोपवाटिकेची सोय असेल.
कार्यान्वयन विषयक पायाभूत सुविधा :
पक्ष्यांच्या खाद्यासाठी स्वयंपाकघर, पक्ष्यांच्या खाद्यान्नासाठी तापमान नियंत्रित साठवणूक केंद्र, पक्ष्यांच्या तळ्यांसाठी जलशुद्धीकरण आणि पाण्याच्या पुनर्वापराची व्यवस्था, तसेच बायोडायजेस्टरसह कचरा व्यवस्थापन व्यवस्थेची सोय असणार आहे.
पर्यटकांसाठीच्या सुविधा :
माहिती आणि शैक्षणिक केंद्र, तिकीट खिडकी, स्मरणिकास्वरुप वस्तूंची दुकाने, उपाहारगृह (तात्पुरते किंवा निम-कायमस्वरूपी), प्रसाधनगृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय यांसारख्या सार्वजनिक सुविधा असतील, त्यासोबतच उत्तम पायवाटा आणि आणि नैसर्गिक संरचनेच्या स्वरुपाताली सुशोभीकरण केले जाणार आहे.
सुरक्षा व्यवस्था :
उद्यानाच्या सीमा निश्चित करण्यासाठी साखळीचे कुंपण असेल, त्यासोबतच सुरक्षा कक्ष आणि सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था उभारली जाईल.
हा उपक्रम पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचा विस्तार आणि शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल ठरणार आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पर्यावरणीय बाबींचा अंतर्भाव करण्याच्या दिशेनेही हा प्रकल्प म्हणजे एक आदर्श प्रारुप ठरेल. यासोबतच या प्रकल्पामुळे जनजागृतीचे उद्दिष्ट साध्य करता येईल, सोबतच नागरिकांसाठी विरंगुळ्याच्या संधीही उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी