
रायगड, 26 मार्च (हिं.स.)। दिव्यांग बांधवांना शहरी जीवन अधिक सुलभ आणि सन्मानजनक बनवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पावले उचलण्यास गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधांच्या अंमलबजावणीबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न झाली..
या बैठकीत शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणे दिव्यांगांसाठी सुगम करण्यावर विशेष भर देण्यात आला. सर्व संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत आयुक्तांनी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः दिव्यांगांसाठी वाहतूक व्यवस्था सुलभ करणे, पनवेल महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट दिव्यांगांसाठी सुलभ (accessible) करणे तसेच माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला.
आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे यांनी दिव्यांग बांधवांच्या अडचणी, त्यांच्या विविध मागण्या आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दिव्यांग विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन त्यांची कार्यक्षमता वाढवण्यावरही भर देण्यात आला.
या बैठकीस दिव्यांग विभागाचे उपायुक्त रवीकिरण घोडके, प्रसेनजित कार्लेकर, सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर, डॉ. रुपाली माने, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आनंद गोसावी, दिव्यांग विभाग प्रमुख हरेश जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना शहरात अधिक सुलभ, सुरक्षित आणि सन्मानाने वावरता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)