
अमरावती, 26 मार्च (हिं.स.) : धारणी तालुक्यातील दिया येथे १० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने जिल्ह्याने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १०० मेगावॅट वीज निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. यामुळे जिल्ह्यातील ३७ हजार ३५५ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊ लागली आहे.
शेतकऱ्यांच्या दिवसा वीजेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत विकेंद्रित स्वरूपातील सौर प्रकल्प उभारण्यावर भर दिला आहे. या योजनेद्वारे राज्यात एकूण १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अमरावती परिमंडळात मुख्य अभियंता अशोक साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अभियंता दीपक देवहाते यांच्या पुढाकाराने या योजनेला वेग आला आहे. जिल्ह्यासाठी ३२८ मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य निश्चित करण्यात आले असून आतापर्यंत २४ सौर प्रकल्प पूर्ण होऊन सुरू झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण सौर ऊर्जा निर्मिती क्षमता ११० मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.
मेळघाटासारख्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्वाची ठरत आहे. धारणी तालुक्यात एकूण २६ मेगावॅट क्षमतेचे तीन सौर प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. यामध्ये दिया येथील १० मेगावॅट प्रकल्पासह डाबका (५ मेगावॅट) आणि कळमखार-धारणी (११ मेगावॅट) प्रकल्पांचा समावेश आहे. यामुळे तालुक्यातील ८ वाहिन्यांवरील ३१०९ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे.
दिया सौर प्रकल्पातून निर्मित वीज महावितरणच्या ३३ केव्ही कढाव उपकेंद्राशी जोडण्यात आली असून, हरिसाल, दुणी आणि पाटिया या ११ केव्ही वाहिन्यांद्वारे ११७४ शेतकऱ्यांना नियमित व खात्रीशीर वीजपुरवठा मिळत आहे.
यापूर्वी २० मार्च रोजी मोर्शी विभागातील ३३ केव्ही बेनोडा उपकेंद्रासाठी ८ मेगावॅट सौर प्रकल्प सुरू झाल्याने जिल्ह्याची वीज निर्मिती क्षमता ९२ मेगावॅटवरून १०० मेगावॅट झाली होती. त्यानंतर दिया प्रकल्पामुळे आणखी १० मेगावॅटची वाढ होऊन एकूण क्षमता ११० मेगावॅट झाली आहे.
दिया आणि बेनोडा या दोन प्रकल्पांमुळे दिवसा वीज मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४ हजार २४७ ने वाढून ३७ हजार ३५५ वर पोहोचली आहे.
दिया सौर प्रकल्पाचे उद्घाटन अचलपूर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी उपकार्यकारी अभियंता देवेंद्र चौधरी, धारणी उपविभागाचे अधिकारी तसेच संबंधित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी