
पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात (दि. १ एप्रिल २०२५ ते २४ मार्च २०२६) तब्बल ८६० कोटी ५९ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद, कर संकलन विभागाचे नियोजनबद्ध कामकाज, विविध सवलतींची प्रभावी अंमलबजावणी तसेच ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. कर भरण्यास चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल महापौर रवि लांडगे यांनी सर्व करदात्यांचे आभार मानले असून, ज्या थकबाकीदार नागरिकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी अभय योजनेचा लाभ घेऊन तात्काळ कर भरणा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
थकबाकीदार नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेमार्फत अभय योजना लागू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत दि. १ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत मालमत्ता कराची रक्कम एकरकमी भरल्यास विलंब दंडावर तब्बल ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अवघे ५ दिवस शिल्लक राहिले आहे.पिंपरी चिंचवड शहरात सध्या निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक व इतर मिळून सुमारे ७ लाख ३२ हजार मालमत्तांची नोंद असून त्यापैकी ५ लाख ७२ हजार ९०२ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केला आहे. दरवर्षी कर भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. तथापि, ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही, अशा थकबाकीदारांवर कर संकलन विभागामार्फत नियमानुसार जप्ती तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु