
लातूर, 26 मार्च (हिं.स.)। आरोपी कडून लॉकअपमध्ये शर्टने फाशी घेण्याचे प्रयत्न उदगीर शहर पोलीस ठाण्यातील लॉकअप ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका आरोपीचा जीव वाचल्याची महत्त्वपूर्ण घटना घडली आहे. वेळेवर दाखवलेल्या धाडस आणि जबाबदारीमुळे मोठा अनर्थ टळला असून या कार्याची दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते संबंधित तिन्ही कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, उदगीर ग्रामीण पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात एका आरोपीस अटक करून त्याला उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. संबंधित आरोपी लॉकअपमध्ये एकटाच होता. पहाटेच्या सुमारास त्याने स्वतःचा शर्ट काढून लॉकअपच्या दरवाज्यावरील लोखंडी रॉडला फास तयार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिस्थिती अतिशय गंभीर बनण्याआधीच लॉकअप ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष त्या हालचालीकडे गेले. क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आरोपीला गळफास घेण्यापासून रोखले आणि त्याचे प्राण वाचवले. त्यांच्या या तत्परतेमुळे लॉकअपमध्ये घडू शकणारी गंभीर घटना टळली असून पोलीस दलाच्या कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण समोर आले आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल पोलीस जमादार मारोती तुडमे, प्रदीप घोरपडे आणि पोलीस नाईक सिद्धेश्वर स्वामी यांचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, तसेच जिल्ह्यातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis