
पुणे, 26 मार्च, (हिं.स.)। रेंजहिल्स (शिवाजीनगर) ते स्वारगेटदरम्यान भुयारी मेट्रो मार्ग गेला आहे, याची माहिती नागरिकांना व्हावी, या उद्देशाने पुणे मेट्रो त्या मार्गावरील जमिनीवर येत्या १५ दिवसांत ‘रूट मार्कर’ बसविणार आहे. त्यावर कूपनलिका (बोअरवेल) खोदण्यासाठी ‘मेट्रो’चे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ नागरिकांना घ्यावे लागणार आहे.
स्वारगेट-रेंजहिल्सदरम्यानच्या भुयारी मार्गावर कूपनलिका खोदण्यासाठीचे काम सुरू असताना मेट्रोच्या बोगद्याला मोठे छिद्र पडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. त्याची दखल घेत पुणे मेट्रोने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर गुन्हा दाखल झाला. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी मेट्रो प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. सुमारे ८० ते १०० फूट खाली हा बोगदा आहे.
पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ म्हणाले, ‘‘झालेला प्रकार गंभीर आहे. त्यामुळे काटेकोर उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिका आणि भूजल सर्वेक्षण विभागाकडेही संपर्क साधला जाणार आहे. कूपनलिकेसाठी परवानगी देताना भुयारी मेट्रो मार्ग लक्षात घेऊनच कार्यवाही करण्याची त्यांना विनंती करण्यात येणार आहे.’’
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु