
अमरावती, 26 मार्च (हिं.स.) : अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत शीघ्र कृती दल (QRT) मधील एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात घडली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मृत जवानाचे नाव विजय नागपुरे असे असल्याची माहिती मिळाली आहे. कार्यालय परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर इतर कर्मचारी तत्काळ घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत जवानाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. प्राथमिक माहितीनुसार, शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. तथापि, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी