
रत्नागिरी, 26 मार्च, (हिं. स.) : रत्नागिरीतील पेट्रोलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. अशातच काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे फलक झळकल्याने वाहनधारकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
मध्य पूर्वेत युद्ध सुरू आहे. इस्रायल,अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले. या युद्धामुळे जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे, अनेक तेलवाहू जहाज अडकून राहिली आहेत. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. यापूर्वीदेखील यासंबंधीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यामुळे शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी होत आहे. मात्र प्रशासनाने पेट्रोलचा कोणताही तुटवडा नसल्याचे जाहीर केले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी