
पुणे, 26 मार्च (हिं.स.)। शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरण्यास प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार पालकांना आता ३१ मार्चपर्यंत आपल्या पाल्यांचे ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.आरटीईनुसार २५ टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाने एक किलोमीटरच्या अंतरातील शाळा निवडण्याची घातलेली अट उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आधी अर्ज भरलेल्या पालकांना पुन्हा अर्ज भरण्यासाठी, तसेच अर्ज न भरलेल्या पालकांना अर्ज भरण्याची संधी दिली आहे.प्राथमिक शिक्षण संचालनालयाने आरटीई संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एक किलोमीटरची अट रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक किलोमीटरच्या आतील शाळांची निवड करून अर्ज भरलेल्या पालकांना प्रवेशासाठी एक किलोमीटर, एक ते तीन किलोमीटर, तसेच तीन किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झाल्या आहेत.
टीईटी परीक्षा २१ जूनला होणारमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून सुरू होत आहे, अशी माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी दिली आहे.राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर एक आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर दोन या पद्धतीने परीक्षा घेतली जाते. त्यानुसार २१ जून रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी एक या वेळेत पेपर एक, तर दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत पेपर दोन होणार आहे.ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क, अन्य माहिती परीक्षा परिषदेच्या ‘https://mscepune.in/’ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रशासकीय अडचणींमुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षार्थ्यांसाठी अद्ययावत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु