

नरेंद्र बुवा पूजाधिकारी यंदाचे मानकरी : ५६ भोगांचा नैवेद्य
नाशिक, 26 मार्च (हिं.स.)।
- नाशिकचे आराध्य दैवत पंचवटी तपोभूमीतील श्री काळाराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे राघवेंद्रबुवा पुजारी यांच्या हस्ते काकडा आरती करण्यात आली, त्यानंतर श्रीराम जन्मोत्सवाचे मानकरी नरेंद्रबुवा पूजाधिकारी यांच्या हस्ते 'श्रीं' चे विधिवत पूजन व आरती करून दुपारी १२ वाजता मुख्य मंदिरात उत्सव मानकरी, पुजारी, विश्वस्तांच्या उपस्थितीत पौरोहित्य व मंत्रोच्चारात रामजन्मोत्सव साजरा झाला.
रामजन्म झाल्यावर सनई चौघडा वाजवीत प्रभू रामाचे जयघोष करीत, गुलाल उधळण करून पेढे, साखर आणि फुटाणे प्रसाद वाटप केले जात आहे. त्यानंतर, दुपारी राममंदिर आवारात महिलांनी फुलांनी सजविलेल्या पाळण्यात रामाची प्रतिमा ठेवून रामजन्मोत्सवानिमित्त भजन गीते गायली.
श्री रामनवमीनिमित्त आज संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व विश्वस्त पुजारी वर्गाच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यावेळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते. मंदिराच्या सभोवताली रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अडथळे पार करीत असंख्य राम भक्त राम मंदिराच्या दिशेने जाताना दिसत होते. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी मंदिरात कार्पेट अंथरण्यात आले आहे.
सायंकाळी देवाला विविध ५६ प्रकारच्या पदार्थांपासून तयार केलेला अन्नकूट नैवेद्य दाखविण्यात आला., तसेच दिवसभर भजनी मंडळाकडून जन्मगीताचा कार्यक्रम संपन्न झाला . श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्री काळाराम मंदिरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त काळाराम मंदिर पूर्व दरवाजा बाहेर सुरू असलेल्या रामकाल पथ प्रकल्प कामामुळे बंद केल्याने यंदा
भाविकांना दर्शनासाठी मुख्य पूर्व दरवाजाऐवजी उत्तर दरवाजाने प्रवेश देऊन दक्षिण दरवाजाने बाहेर निघण्याची व्यवस्था केली आहे. उन्हामुळे भाविकांना दिलासा मिळावा, यासाठी शामियाना उभारून भाविकांना प्रसाद वाटप केला जात आहे. तसेच मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. पोलीस प्रशासनातर्फे श्री काळाराम राममंदिर परिसरात पोलीस बळ तैनात करत मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहनांना बंदी घालत पायी जाणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांच्यासह इतर मान्यवरांनी काळा रामाचे दर्शन घेतले
श्री रामनवमीनिमित्ताने दुपारी प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानंतर दर्शनासाठी आलेल्या रामभक्तांना यंदा सुमारे ५ हजार लाडूंचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV