
रायगड, 26 मार्च (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सुमारे १६२ मंदिरांमध्ये रामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, तर १२९ ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात आल्या. रामनामाच्या गजरात भजन-कीर्तनांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगून गेला होता.
अलिबाग शहरातील रामनाथ परिसरातील आंग्रेकालीन पुरातन श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव विशेष उत्साहात पार पडला. सुमारे अडीचशे वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. यानंतर श्रुती बोंद्रे यांचे रामजन्मावर आधारित कीर्तन झाले. दुपारी १२.३० वाजता रामजन्म सोहळा पार पडताच भक्तांनी “जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
अलिबाग शहरातील ब्राह्मण आळीतील राम मंदिरातही मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. महिलांची विशेष उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. तसेच नवखार, रेवस, हाशिवरे, वाघरण, आवास आणि रांजणपाडा या भागांतही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
रेवस कोळीवाड्यात रामनवमीपूर्वी सप्ताह साजरा करण्याची जुनी परंपरा असून, यंदाही ती जपण्यात आली. पनवेल तालुक्यातील आपटा येथील श्रीराम मंदिरात गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत नऊ दिवसांचा उत्सव साजरा करण्यात आला. या काळात गावातील एकोप्याचे दर्शन घडवणारी परंपरा म्हणून कोणत्याही घरात चूल पेटत नाही, तर सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे प्रसाद ग्रहण करतात.
आगरी, कोळी आणि माळी समाजासाठी राम मंदिर हे श्रद्धास्थान असून मुरूड तालुक्यातील एकदरा, सावली मिठागर यांसह जिल्ह्यातील अनेक गावांत रामजन्मोत्सव मोठ्या थाटात पार पडला. दुपारी जन्मोत्सव, तर संध्याकाळी पालखी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. भजन-कीर्तन, रामनामाचा गजर आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण रायगड जिल्हा भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)