सशक्ती कॉन्क्लेव्ह 2025-26 चे मुंबईत उद्घाटन
मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे महिलांना डिजिटल साक्षरता, आर्थिक नियोजन आणि व्यवसाय उभारणीसाठी मोठा आधार मिळत असून, या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक
Sashakti Conclave 2025-26 Inaugurated in Mumbai


मुंबई, 26 मार्च, (हिं.स.)। लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे महिलांना डिजिटल साक्षरता, आर्थिक नियोजन आणि व्यवसाय उभारणीसाठी मोठा आधार मिळत असून, या माध्यमातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक प्रभावीपणे होत असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

मुंबई येथे लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सशक्ती कॉन्क्लेव्ह 2025-26’ च्या उद्घाटनप्रसंगी तसेच भांडवल व अनुदान वितरण समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघर्षशील आणि जिद्दी माता-भगिनींच्या प्रवासाचा प्रेरणादायी संवाद उलगडण्यात आला. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हा समन्वय अधिकारी विजय ढोके, मास्टरकार्डचे उपाध्यक्ष श्री. हरीश बाबू एस.एन., वरिष्ठ व्यवस्थापक (कायदेशीर) श्री. सरथ चंद्रण, लर्निंग लिंक्स फाउंडेशनच्या ट्रस्टी ॲग्नेस नाथन, वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक अपूर्वा शिंदे तसेच विविध संस्था, माविम आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून अनेक महिलांनी बचतीतून लघुउद्योग सुरू केले असून, या महिलांना लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने दिले जाणारे प्रशिक्षण, भांडवल आणि मार्गदर्शन यामुळे व्यवसाय उभारणीसाठी तसेच उत्पादने बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी मोठी मदत मिळत आहे.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील अनेक महिला ऑनलाईन व्यवहार करत असताना डिजिटल प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा वेळी डिजिटल आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या माध्यमातून दिले जाणारे हे प्रशिक्षण महिलांना अधिक सक्षम बनवत असून, अशा उपक्रमांचा विस्तार राज्यभर होणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड जिल्ह्यांत सुरू असलेले हे कार्य राज्यभर विस्तारावे, जेणेकरून अधिकाधिक ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महिला व बालविकास विभाग, महिला विकास मंडळ आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करून हा लाभ अधिक महिलांपर्यंत पोहोचवावा.

दरम्यान, 2022 पासून सुरू झालेल्या ‘सशक्ती’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत 7 राज्यांतील वंचित घटकांमधील 82,000 हून अधिक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे, ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे.

या कार्यक्रमादरम्यान दिल्ली आणि पुणे येथील 30 हून अधिक महिला उद्योजिकांना त्यांचा व्यवसाय विस्तारण्यासाठी शिवणयंत्र, घरगुती पिठाची गिरणी, मसाला बनविण्यासाठी पल्व्हरायझर, ब्युटी पार्लर किट तसेच बेकरीसाठी आवश्यक साहित्य वितरित करण्यात आले.

‘सशक्ती महिला उद्योजकता कार्यक्रम’ हा लर्निंग लिंक्स फाउंडेशनद्वारे राबविण्यात येणारा आणि मास्टरकार्डच्या सहकार्याने चालणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम असून, पहिल्या आणि दुसऱ्या पिढीतील कमी उत्पन्न गटातील महिला उद्योजकांना आर्थिक साक्षरता, डिजिटल साधने आणि व्यवसाय नियोजन कौशल्य देण्यावर भर देतो. 2022 पासून हा कार्यक्रम महाराष्ट्रासह दिल्ली, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande