
जळगाव , 26 मार्च (हिं.स.)पाचोरा शहरातील जामनेर रोड परिसरात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत ‘न्यू अलंकार ड्रायफ्रूट’ हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून या घटनेत सुमारे २५ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. फिर्यादी अनुप गगनदास केसवानी यांच्या मालकीचे जामनेर रोडवरील महावीर व्यापारी संकुलातील गाळा क्रमांक १८, १९ आणि २० मध्ये ‘न्यू अलंकार ड्रायफ्रूट’ हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री सुमारे १०.३० वाजता दुकान बंद करून त्यांचा भाऊ घरी गेला होता. मध्यरात्री सुमारे २.५५ वाजता पाचोरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी फोन करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यावर दुकानातून मोठ्या प्रमाणावर धूर व ज्वाळा उसळत असल्याचे दिसून आले. पाचोरा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र आग बराच वेळ धगधगत राहिल्यामुळे दुकानातील सर्व माल पूर्णतः जळून खाक झाला. या आगीत ड्रायफ्रूट, खजूर, नामांकित कंपन्यांचे नमकीन, आईस्क्रीम, गावरान तूप, स्वीट्स, बेकरी व डेअरी प्रॉडक्ट्स यांसह मोठ्या प्रमाणावर माल नष्ट झाला. तसेच दुकानातील फर्निचर, फ्रीज, डीप फ्रीज, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, पीओपी सिलिंग, काउंटर आणि सर्व विद्युत उपकरणेही जळून खाक झाली. या घटनेत एकूण सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर