
सोलापूर, 26 मार्च (हिं.स.)दूध भेसळीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अन्नसुरक्षा व मानांकन प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दूध उत्पादक व विक्रेत्यांसाठी नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सहकारी दूध संघाबाहेर काम करणाऱ्या स्वतंत्र दूध उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठ्या प्रमाणात भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई होण्याऐवजी लहान उत्पादकांनाच लक्ष्य केले जाईल, अशी शंका व्यक्त होत आहे.
राज्यात रोज साधारण एक कोटी सत्तर लाख लिटर दूध उत्पादन होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, पशुसंवर्धन विभागाच्या अंदाजानुसार हे उत्पादन यापेक्षा खूपच कमी असणे अपेक्षित आहे. त्यामुळे बाजारात भेसळयुक्त दूध येत असल्याची चर्चा आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठ्या दूध संघांवर, दूध प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांवर तसेच हॉटेल व्यावसायिकांवर नियमित आणि कडक तपासणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दररोज मोठ्या प्रमाणात दूध संकलन करणाऱ्या संघांची तसेच त्यांनी तयार केलेल्या उपपदार्थांची तपासणी नियमितपणे करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड