जनगणना केवळ आकडेवारी नाही; देशाच्या प्रगतीचे प्रतिबिंब – लातूर जिल्हाधिकारी
- जनगणना 2027 साठी तयारीला वेग; लातूरमध्ये प्रशिक्षण सत्रास सुरुवात लातूर, 26 मार्च (हिं.स.)। जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून तिच्या अचूकतेवरच भविष्यातील धोरणांचा पाया अवलंबून असतो. त्यामुळे जनगणनेच्या काम
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे


- जनगणना 2027 साठी तयारीला वेग; लातूरमध्ये प्रशिक्षण सत्रास सुरुवात

लातूर, 26 मार्च (हिं.स.)।

जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून तिच्या अचूकतेवरच भविष्यातील धोरणांचा पाया अवलंबून असतो. त्यामुळे जनगणनेच्या कामात सर्वांनी सजग राहून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे आणि कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले.

भारताची जनगणना २०२७ अंतर्गत तहसीलदार व मुख्याधिकारी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील तीन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले आहे. या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले, मिलिंद पाटील, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा जनगणना समन्वयक विठ्ठल परब यांच्यासह जिल्ह्यातील २३ चार्ज अधिकारी आणि १०६ प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे म्हणाल्या, जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक स्थितीचे प्रतिबिंब असते. प्रत्येक घर व कुटुंब जनगणनेत समाविष्ट होईल, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. प्रगणकांना योग्य व दर्जेदार प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून अचूक काम करून घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

जनतेशी संवाद साधताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, जेणेकरून नागरिकांचा सहभाग वाढेल. सर्व चार्ज अधिकारी व प्रशिक्षणार्थींनी समन्वय ठेवून ही प्रक्रिया यशस्वी करावी. दहा वर्षांनंतर येणारी जनगणना ही देशसेवेची मोठी संधी असून या कामात कोणताही हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande